पुणे, पिंपरी-चिंचवडसह अनेक भागांमध्ये शनिवारी रात्री आणि रविवारी अवकाळी पाऊस बरसला. पुणे आणि परिसरात रविवारी रात्री साडे आठ वाजेपर्यंत दीड मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची त्रेधा उडवली.
पुण्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दोन दिवस ढगाळ वातावरणामुळे ऐन नोव्हेंबरमध्येही उकाडा होता. शहर आणि परिसरात शनिवारी रात्री पावसाला सुरूवात झाली. रविवारी सकाळी विश्रांती घेतलेला पाऊस दुपारनंतर मात्र बरसू लागला. शहराच्या विविध भागांत साधारण दुपारी १ वाजल्यापासून गडगडाटासह पावसाला सुरूवात झाली. दुपारी एखाद दोन सरींनंतर सायंकाळी मात्र पावसाने शहराला झोडपून काढले. रात्री उशीरापर्यंत शहराच्या सर्व भागांत जोरदार पाऊस होता. रात्री साठेआठ पर्यंत १.५ मिलिमिटर पावसाची नोंद पुणे वेधशाळेने केली आहे. गेल्या दोन दिवसांत पुण्याच्या तापमानातही ५ अंश सेल्सिअसनी वाढ झाली आहे.
अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची त्रेधा उडवली. रस्ते निसरडे झाल्यामुळे रस्त्यांवर दुचाकी घसरल्याच्या अनेक घटना घडल्या. सायंकाळी अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. पिंपरी-चिंचवड, लोणावळा आणि जिल्ह्य़ातील अनेक भागांमध्येही पाऊस झाला. लोणावळ्यात अचानक आलेल्या पावसाचा पर्यटकांनी आनंदही लुटला.