शिवाजीनगर, कोथरूड, सिंहगड रस्ता, हडपसर, कात्रजसह पुण्याच्या बऱ्याचशा भागात बुधवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. पुण्यात दोन दिवस पाऊस पडेल, असा अंदाज वेधशाळेने मंगळवारीच वर्तविला होता. त्याप्रमाणे दुपारपासूनच ढगांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. साधारणपणे तासभर पाऊस पडत होता.
सिंहगड रस्ता, कात्रज परिसरात पावसाचा जोर जास्त होता. तुलनेत शिवाजीनगर, जंगली महाराज रस्ता, हडपसर या भागामध्ये पावसाचा जोर कमी होता. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची अडचण झाली. दुचाकीस्वारांची तारांबळ उडाली. पावसाच्या सरींमुळे उन्हाचा तडाखा सहन करणाऱ्या पुणेकरांना अल्पसा दिलासा मिळाला आहे.