News Flash

पुणे पोलिसांना महापौरांनी ठोकला ‘सलाम’, मुसळधार पावसातील ‘तो’ व्हिडिओ पाहून दिली प्रतिक्रिया

महापौरांनी 'सलाम' ठोकल्यानंतर पुणे पोलिस आयुक्तांनीही मानले आभार, म्हणाले...

पुण्यात शुक्रवारी संध्याकाळनंतर वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शहरात अक्षरशः थैमान घातलं. पुण्यात सर्व पेठांसह सिंहगड रस्ता, बुधवार पेठ, हडपसर, कोथरूड, शिवाजीनगर, कात्रज, वारजे, कोंढवा, बिबवेवाडी, मुळाशी, भूगाव, बावधन या ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला.

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. शिवाजीनगर भागातील संचेती हॉस्पिटल जवळील दिशादर्शक कमान वादळी वाऱ्याने कोसळली . तर, मंगळवार पेठ परिसरात मोबाईल टॉवर कोसळला. पण सुदैवाने लॉकडाऊनमुळे रस्त्यावर वर्दळ नव्हती. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आणि कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

मुसळधार पावसामुळे करोनाविरोधातील लढ्यात रस्त्यावर आपली ड्युटी बजावणाऱ्या पोलिसांचीही मोठी तारांबळ उडाली. विश्रामबागवाड्यासमोरील रस्त्यावर ड्युटीवर असलेल्या पोलिसांचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या रस्त्यावर पोलिसांनी नाकेबंदी केली असून कर्तव्यावर असताना थोडावेळ सावली मिळावी, आराम करता यावा यासाठी त्यांनी रस्त्याच्या बाजूला तात्पुरत्या तंबूची व्यवस्था केली आहे. पण वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पोलिसांचा हा तात्पुरता निवाराही उडून जात होता. मात्र तेथील पोलिसांनी मोठी कसरत करत १०-१५ मिनिटे मुसळधार पावसामध्ये उभे राहून तंबू कसाबसा धरुन ठेवला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे पोलिसांना सलाम ठोकला असून ते बजावत असलेल्या कार्याचं कौतुक केलंय. ट्विटरवर पुणे पोलिसांनी टॅग करत, “सलाम… कोरोनाच्या संकटकाळात अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या घटकांना वेगवेगळ्या पातळ्यांवर संघर्ष करावा लागतो. मात्र ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता हे योद्धे लढत राहतात. आजच्या पावसात विश्रामबागवाड्यासमोर दिसलेलं हे चित्र याचीच साक्ष देते”, असे ट्विट महापौरांनी केले.

महापौरांच्या या ट्विटवर पुणे पोलिस आयुक्तांनीही रिप्लाय दिला आणि आभार मानले. ‘तुमची साथ असेल तर भविष्यातही आमचे कार्य असेच सुरू राहील’, अशा आशयाचे ट्विट पुणे पोलिस आयुक्तांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकरीही पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2020 9:33 am

Web Title: unseasonal very heavy rains in pune mayor salutes pune police after seeing viral video sas 89
Next Stories
1 Google Meet आता सर्वांसाठी मोफत, कसं करायचं रजिस्ट्रेशन?
2 Lockdown offer : दोन हजारांत कोब्रा, दीड लाखांत घ्या हत्ती
3 Jio-व्होडाफोनची ‘बंपर’ ऑफर, ‘फ्री’मध्ये दररोज 2GB डेटा
Just Now!
X