09 December 2019

News Flash

राज्यात आठवडाभर गारठा 

अवकाळी पाऊस, गारपिटीची शक्यता

अवकाळी पाऊस, गारपिटीची शक्यता

बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव घटल्यानंतर उत्तर भारतातून येणाऱ्या अतिथंड वाऱ्यांमुळे राज्याच्या बहुतांश भागांत सध्या थंडीची लाट आली आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट होऊन दविबदू गोठून हिमकण तयार होत आहेत. उत्तरेकडील राज्यातील थंडीची स्थिती लक्षात घेता महाराष्ट्रात पुढील आठवडाभर गारठा राहण्याचे संकेत असून, काही भागांत थंडीची तीव्रता वाढू शकते. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात काही ठिकाणी अवकाळी पाऊस तसेच गारपिटीची शक्यताही कायम असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे थंडी कमी झाल्यानंतर उन्हाळय़ाची सुरुवात झाल्याचे वाटत असतानाच तीन ते चार दिवसांपासून थंडीने पुन्हा डोके वर काढले. शनिवारी (९ फेब्रुवारी) राज्यातील किमान तापमानाच्या पाऱ्यात लक्षणीय घट नोंदविली गेली. नाशिक, पुणे आदी ठिकाणी हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. रविवारीही राज्यातील किमान तापमानाचा पारा घसरलेलाच होता. पुढील आठवडाभर राज्याच्या वातावरणातील हवेचा दाब वाढणार आहे. त्यामुळे किमान तापमानात घट होऊन थंडी वाढणार आहे. नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, सातारा, नगर येथे गारठा राहणार आहे. या भागातील किमान तापमान आठवडाभर ९ ते १३ अंश सेल्सिअसपर्यंत राहणार आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भातही थंडीची तीव्रता कायम राहणार आहे.

उत्तर भारतातील राजस्थान, काश्मीर, पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली आदी भागांत काही दिवस थंडीची तीव्रता कायम राहणार आहे. रविवारी नगर येथे राज्यातील नीचांकी ४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

किमान तापमान (अंश सेल्सिअस)

मुंबई (कुलाबा) १६.८, सांताक्रुझ १२.४, अलिबाग १३.६, रत्नागिरी १४.८, पुणे ६.२, नगर ४.९, नाशिक ५.०, जळगाव ७.४, कोल्हापूर १५.१, महाबळेश्वर १२.२, मालेगाव ६.२, सांगली १०.४, सातारा ९.४, सोलापूर १३.०, औरंगाबाद ६.४, परभणी ८.५, नांदेड १०.५, बीड ८.५, अकोला ८.५, अमरावती १०.४, बुलडाणा ९.३, ब्रम्हपुरी ७.९, चंद्रपूर आणि गोंदिया प्रत्येकी १२.२, नागपूर ६.३, वर्धा १०, यवतमाळ ११.०

काही पिकांना फटका, काहींना फायदा

  • थंडीच्या लाटेमुळे अनेक ठिकाणी दवबिंदू गोठून हिमकण तयार होत असल्याने त्याचा फटका द्राक्ष, किलगड, टोमॅटो आणि पालेभाज्यांना बसतो आहे.
  • साठवलेल्या सुक्या चाऱ्यावर हिमकण जमा झाल्याने चाऱ्याला बुरशीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. गहू, ज्वारी, कांदा, हरभरा या पिकांना मात्र थंडीचा फायदा होतो.

First Published on February 11, 2019 12:13 am

Web Title: untimely rain chances in maharashtra
Just Now!
X