बुधवापर्यंत सरींची शक्यता; ढगाळ स्थिती, पावसाच्या शिडकाव्याने उकाडय़ात घट

राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी २१ मार्चपर्यंत अवकाळी पावसाचे सावट असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मागील तीन ते चार दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आहे. मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी, तर कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी शनिवारी पावसाने हजेरी लावली. ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाच्या पावसामुळे राज्याच्या बहुतांश भागांतील उकाडा कमी झाला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी हलका पाऊस पडल्याने कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले. कमाल आणि किमान तापमान ३ ते ५ अंशांनी घटले असून काही काळ तरी तीव्र उकाडय़ापासून सुटका झाली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार १९ आणि २० मार्चला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात,२० मार्चला मराठवाडा आणि विदर्भात, तर २१ मार्चला विदर्भातील तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे.

रविवारी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रत काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज आहे. शनिवारी कोकण, गोव्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली.  राज्यात सर्वाधिक तापमान जळगाव येथे ३६.६ अंश सेल्सिअस, तर सर्वात कमी तापमान वाशिम येथे १४.० अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.

राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमान

मुंबई (कुलाबा ) ३३.०/२३.८, सांताक्रुझ ३५.४/२२.४, अलिबाग ३०.४/२२.८, रत्नागिरी ३५.६/२३.८, भिरा ३४.०/२१.८, पुणे २८.२/१६.९, नगर ३१.०/१५.२, जळगाव ३६.६/१८.०, कोल्हापूर २९.३/२०.९, महाबळेश्वर २६.८/१७.०, मालेगाव ३६.४/१७.६, नाशिक ३३.०/१५.६, सांगली २९.४/२०.७, सातारा ३१.०/१९.०, सोलापूर ३०.१/१९.६, औरंगाबाद २९.४/१५.०, परभणी २२.५/१६.०, अकोला ३२.५/१७.२, अमरावती २९.२/१६.६, बुलडाणा २८.५/१७.०, ब्रह्मपुरी २३.२/१४.१,चंद्रपूर २५.२/१८.२, गोंदिया २५.४/१७.५, नागपूर २७.६/१६.३, वाशिम २९.०/१४.०, वर्धा २९.०/१६.०, यवतमाळ ३१.०/१५.४.