भाडेतत्त्वावरील सायकली जाळण्याचे प्रकार

खासगी वाहनांची वाढती संख्या, सातत्याने होणारी वाहतूककोंडी आणि प्रदूषण टाळण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या भाडेतत्त्वावरील सायकल योजनेला शहरात सर्व घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र, या योजनेतील सायकलींची मोडतोड करणे, वापर झाल्यावर त्या नाल्यांमध्ये किंवा नदीपात्रात फेकून देणे, सायकलचे कुलूप तोडणे असे प्रकार सातत्याने होत असतानाच कर्वेनगर येथे या योजनेतील सायकली जाळण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे.

सायकल वापरा योजनेला सुजाण नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असला तरी काही जणांकडून मात्र या चांगल्या योजनेचा बोजवारा उडवण्याचे काम होत असल्याचे या प्रकारामुळे स्पष्ट झाले आहे. स्मार्ट सिटी प्रशासन आणि महापालिकेकडून अशा प्रकारांबाबत कोणतीही दंडात्मक कारवाई होत नसल्यामुळे सायकलींच्या मोडतोडीचे प्रकार वाढले आहेत.

शहराच्या वाहतुकीमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक बदल झाले आहेत. खासगी वाहनांची वाढलेली संख्या, अपुरे आणि अरुंद रस्ते, सार्वजनिक वाहतुकीची कोलमडलेली सेवा आणि वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर भाडेतत्त्वावरील सायकल योजनेचा पर्याय पुढे आला. कित्येक वर्षे त्यावर चर्चा केल्यानंतर काही महिन्यांपूर्वी ही योजना प्रत्यक्षात सुरू झाली. अल्प भाडे, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि वापरण्यास सुलभ असल्याने या सायकल पुणेकरांमध्ये लोकप्रिय ठरल्या. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेली ही सेवा शहराच्या अनेक भागांत सुरू करण्यात आली. पण या योजनेला अनेकांकडून खो घालण्यात येत आहे. प्रारंभी या सायकलींची चोरी होत असल्याच्या तक्रारी येत होत्या, पण आता सायकलची मोडतोड करणे, कुलूप तोडणे, सायकल वापरून फेकून देणे असे प्रकार सुरू झाले आहेत.

‘काही दिवसांपूर्वी कोथरूड परिसरातील एका वस्तीमध्ये सायकली लपवून ठेवल्याचे निदर्शनास आले होते. या बाबत महापालिका, स्मार्ट सिटी आणि पोलिसांकडे तक्रार केली होती. डहाणूकर चौक परिसरातील परांजपे बिझनेस हब शेजारी कचऱ्याबरोबरच भाडेतत्त्वावरील सायकली जाळण्यात येत होत्या. याच ठिकाणी पंधरा दिवसांपूर्वी अडगळीत पडलेल्या सायकली आढळून आल्या होत्या. त्यामुळे अशा गैरप्रकारांबाबत स्मार्ट सिटी प्रशासन, संबंधित सायकल कंपन्या आणि महानगरपालिका प्रशासनाने उपाययोजना करावी’, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केली आहे.

असे प्रकार वारंवार घडत असून, एकुणात सायकलच्या वापराबाबतची विकृती सातत्याने पुढे येत आहे. या लोकप्रिय योजनेबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता आहे, असेही खर्डेकर यांनी सांगितले.

सायकली गायब होण्याचेही प्रकार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात या योजनेंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर ओफो कंपनीच्या २७५ सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, २७५ पैकी १६० सायकली विद्यापीठातून गायब झाल्या होत्या. काही सायकली चोरीला गेल्या, तर ६० सायकली दुरुस्तीसाठी पाठवण्यात आल्या होत्या. विद्यापीठाजवळील पाडळवस्ती येथे सायकल जाळल्याचा प्रकार उघडकीस आला होता.