नवीन अभ्यासक्रम आणि प्रादेशिक भाषेचा वाद यामुळे चर्चेत राहिलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत यंदा महाराष्ट्राची सार्वत्रिक घसरण पाहायला मिळाली. गतवर्षी ९९८ पैकी ९८ उमेदवारांच्या तुलनेत यंदा ११२२ उमेदवारांपैकी महाराष्ट्रातून ९० जणांनाच या परीक्षेत यश मिळवता आले, तर पहिल्या १०० जणांतही महाराष्ट्राचे केवळ सात उमेदवार आहेत. राजस्थानचा आयपीएस अधिकारी असलेला गौरव अग्रवाल या परीक्षेत देशातून पहिला आला. तर देशात चौदावा क्रमांक मिळवणारा चंद्रपूरचा विपीन इटणकर राज्यात अव्वल ठरला.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०१३ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. या वर्षी प्रथमच नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा घेण्यात आल्यामुळे निकालाबाबत उत्सुकता होती. गौरव अग्रवालपाठोपाठ दुसरा व तिसरा क्रमांक दिल्लीच्या अनुक्रमे मुनीश शर्मा आणि रचित राज यांनी पटकावला. देशात तीन वर्षांनंतर पहिल्यांदाच पहिल्या तीन क्रमांकांवर मुलांनी बाजी मारली आहे.
प्रशासकीय सेवा, विदेश सेवा, पोलीस सेवा आणि केंद्रातील अ आणि ब दर्जाच्या सेवांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. यंदा पूर्वपरीक्षेला सुमारे साडेतीन लाख उमेदवार बसले होते. त्यातून मुख्य परीक्षेसाठी साधारण १७ हजार उमेदवारांची निवड करण्यात आली होती. मुख्य परीक्षेनंतर मुलाखतीसाठी ३ हजार उमेदवारांची निवड करण्यात आली होती. या परीक्षेतून १ हजार २२८ पदांसाठी १ हजार १२२ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. या परीक्षेतून निवड करण्यात आलेल्या उमेदवारांमधून १८० उमेदवारांची प्रशासकीय सेवेसाठी, ३२ उमेदवारांची विदेश सेवेसाठी तर १५० उमेदवारांची पोलीस सेवेसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. केंद्रातील ‘अ’ दर्जाच्या पदांसाठी ७१० उमेदवारांची तर ब दर्जाच्या पदांसाठी १५६ उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
राज्याची पीछेहाट
*या वर्षीच्या अव्वल शंभर उमेदवारांमध्ये राज्यातील केवळ सात, तर दोनशेमध्ये १२ उमेदवारांचा समावेश आहे. गेल्या वर्षी ९९८ यशस्वी उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील ९८ जणांचा समावेश होता. या वेळी ११२२ मध्ये राज्यातील ९० जणांचा समावेश आहे.
*राज्यात पहिला आलेला विपीन इटणकर एमबीबीएस असून सध्या तो चंदीगडला एम.डी. करीत आहे. त्याचे वडील चंद्रपूरच्या महाराष्ट्र इलेक्ट्रोस्मेल्ट कंपनीत नोकरीला होते. काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. सध्या त्याचे कुटुंबीय नागपूरला वास्तव्यास आहेत.
*देशात पहिला येण्याचा मान मिळवणारे गौरव अग्रवाल यांनी परीक्षेसाठी अर्थशास्त्र विषय निवडला होता. कानपूर आयआयटीमधून बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ही पदवी मिळवल्यानंतर त्यांनी आयआयएम लखनऊमधून व्यवस्थापन विषयात पदवी मिळवली. त्यांनी हाँगकाँगमधील सिटी बँकेतही नोकरी केली आहे.
निकालाची वैशिष्टय़े
*देशात तीन वर्षांनंतर मुलांची बाजी, पहिल्या तीनही क्रमांकावर मुले. स्थानिक भाषांपेक्षा इंग्रजी माध्यमातून परीक्षा देणाऱ्यांची संख्या जास्त
*अभियांत्रिकी, वैद्यकीयच्या उमेदवारांची संख्या जास्त. पहिल्या संधीत उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या घटली
*देशात मुलींचे प्रमाण २५ ते ३० टक्के. राज्यात मुलींचे प्रमाण १० टक्क्यांहून कमी.