News Flash

UPSC Exam Result 2016 : यूपीएससीत महाराष्ट्राच्या यशात काकणभर वाढ

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत निवड झालेल्या राज्यातील उमेदवारांची संख्या शंभरहून अधिक आहे.

अभियांत्रिकी पदवीधरांची निकालात सरशी; मुलींची संख्या कमी

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत या वर्षी केंद्रीय सेवेत जाणाऱ्या राज्यातील एकूण उमेदवारांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. आतापर्यंतची सर्वोत्तम श्रेणीही या वर्षी मिळाली आहे. असे असले तरी वरची श्रेणी मिळवणाऱ्या राज्यातील उमेदवारांची संख्या या वर्षीही कमीच दिसत आहे. निवड झालेल्या उमेदवारांपैकी पहिल्या शंभरमध्ये राज्यातील पाच ते सात उमेदवार आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत निवड झालेल्या राज्यातील उमेदवारांची संख्या शंभरहून अधिक आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत निवड होणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण या वर्षी थोडे वाढले आहे. गेली काही वर्षे साधरण ८० ते ९० उमेदवार उत्तीर्ण होत होते. या वर्षी साधारण १०० ते ११० उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. पहिल्या शंभर उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील पाच ते सातच उमेदवार आहेत. पहिल्या दोनशेमध्येही १० ते १५ उमेदवारांनाच स्थान मिळाले आहे. या वर्षी राज्यातील साधारण ६० हजार उमेदवार पूर्वपरीक्षेला बसले होते. या वर्षी राज्यातील मुलींचे प्रमाण कमी आहे. राज्यातील साधारण १२ ते १५ मुलींनीच या परीक्षेत यश मिळवले आहे. यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये यापूर्वी परीक्षा दिलेल्या, सेवेत असलेल्या उमेदवारांचे प्रमाण अधिक आहे. गेल्या काही वर्षांप्रमाणेच या वर्षीही अभियांत्रिकी पदवीधरांची निकालात सरशी आहे. राज्यातील उत्तीर्ण उमेदवारांचे सरासरी वय कमी झाले आहे. उत्तीर्ण झालेले बहुतेक उमेदवार हे २५ ते ३० वर्षे वयोगटातील आहेत.

अन्सार शेख २१ व्या वर्षी आयएएस

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जालन्यातील अन्सार शेख हा उमेदवार अवघ्या २१ व्या वर्षी यूपीएससीमध्ये यशस्वी ठरला आहे. त्याला देशात ३६१ वा गुणानुक्रमांक मिळाला असून प्रशासकीय सेवेसाठी तो पात्र ठरला आहे.अन्सार जालन्याचा, शिक्षणासाठी पुण्यात आला. फग्र्युसन महाविद्यालयातून राज्यशास्त्र विषयातील पदवी घेतानाच यूपीएससीचा अभ्यासही सुरू होता. अन्सारचे वडील रिक्षाचालक आहेत.

घरात शिक्षणाचे वातावरण फारसे नाही. पुण्यात शिक्षणासाठी आल्यावरही राहण्यासाठी जागा मिळवण्यापासून आलेल्या अनेक अडचणींना तोंड देत त्याने अभ्यास सुरूच ठेवला. अवघ्या २१ व्या वर्षी तो यूपीएससीत यशस्वी झाला आहे.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे नाव आणि गुणानुक्रमांक

योगेश कुंभेजकर (८)

श्रीकृष्ण पांचाळ (१६)

सौरभ गहरवार (४६)

हनुमंत झेंडगे (५०)

विष्णू महाजन (७०)

विशाल सिंग (७३)

निखील पाठक (१०७)

सिद्धेश्वर बोंदर (१२४)

स्वप्नील वानखेडे (१३२)

नीलभ रोहन (१६४)

रोहन बोत्रे (१८७)

स्वप्नील खरे (१९७)

राहुल पांडवे (२००)

मी आयआयटीमधून अभियांत्रिकी पदवी घेतली. सिटी बँकेत नोकरी केली, व्यवस्थापन अभ्यासक्रमाचीही पदवी घेतली. मात्र, मला प्रशासकीय सेवेतच यायचे होते.आपले उद्दिष्ट निश्चित असले की यश मिळवणे अधिक सोपे होते. मला सेवेत आल्यानंतर शिक्षण, महिला आणि बालविकास या विषयांवर काम करायला अधिक आवडेल.’’

– योगेश कुंभेजकर (राज्यात प्रथम, देशांत ८ वा)

राज्यातील उमेदवारांचे प्रमाण स्थिर आहे. त्यात घसरण झाली नसली, तरी वाढही झालेली नाही. मात्र वरची श्रेणी मिळवणाऱ्या राज्यातील उमेदवारांची संख्या खूप कमी आहे. पहिल्या शंभर उमेदवारांमध्ये स्थान मिळवणाऱ्या राज्यातील उमेदवारांचे प्रमाण वाढणे गरजेचे आहे.

– अविनाश धर्माधिकारी, चाणक्य मंडल

गेल्या वर्षी पहिल्या पन्नास उमेदवारांमध्ये महाराष्ट्राचे कुणीच नव्हते. या वर्षी तुलनेने परिस्थिती चांगली आहे. मात्र मुलींचे प्रमाण अद्यापही कमी आहे. देशपातळीवर मुलींचे प्रमाण चांगले आहे. मात्र, राज्यातील मुलींचे प्रमाण वाढण्याची आवश्यकता आहे. खेडेगावातील, स्व-अध्ययन करणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण वाढले आहे, ही स्वागतार्ह गोष्ट आहे.’’

– विश्वनाथ पाटील, पृथ्वी

राज्यातील उमेदवारांचे प्रमाण अधिक वाढायला हवे. मुलींची संख्याही वाढायला हवी हे खरे आहे. मात्र आता ठरवून, ध्येय ठेवून या परीक्षेचा अभ्यास करणारे उमेदवार यशस्वी होत असल्याचे दिसत आहे. पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होणाऱ्या उमेदवारांची संख्याही वाढली आहे.

– तुकाराम जाधव, द युनिक अ‍ॅकॅडमी

यूपीएससीमध्ये निवड होणाऱ्यांमध्ये बीई, एमई, एमटेक, डॉक्टर अशा व्यावसायिक अभ्यासक्रमाची पदवी असलेल्या उमेदवारांची संख्या वाढते आहे. यंदाही निवड झालेल्यांमध्ये अभियांत्रिकीतील पदवीधरांची संख्या लक्षणीय आहे.

– अजित पडवळ, लक्ष्य अकॅडमी

राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या संकल्पनेतून मागच्या वर्षी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात अभिरुप मुलाखतींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यंदा या कार्यक्रमाचा लाभ १२० मराठी मुलांनी लाभ घेतला यापैकी ३७ विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.

– डॉ. शैलेंद्र देवळणकर, संचालक, राज्य प्रशासकीय करिअर संस्था

मी गेली दोन वर्षे लोकसेवा आयोगाच्या(युपीएससी) परीक्षेसाठी प्रयत्न करीत होतो. माझे आई-बाबा शेती करतात मात्र तरी त्यांनी मला नेहमी परीक्षेसाठी प्रोत्साहन दिले आहे. अखेर माझी निवड झाली याचा मला आणि माझ्या कुटुंबाला आनंद आहे.

यशस्वी विद्यार्थी सिद्धेश्वर भोंदर, उस्मानाबाद

लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याची ही माझी पहिली वेळ होती आणि पहिल्याच वेळी माझी निवड झाली. गेली दीड वर्षे मी खूप मेहनत घेतली आहे. पहिल्याच प्रयत्नात माझी निवड झाल्याचा आनंद आहे.

यशस्वी विद्यार्थी अक्षय कोंडे, पुणे

((((  आई सुनीता आणि वडील विजय यांच्यासोबत  (मध्यभागी) योगेश कुंभेजकर. )))

www.upsc.gov.in

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2016 3:49 am

Web Title: upsc exam result
टॅग : Upsc
Next Stories
1 पिंपरीत काँग्रेसचे विष्णुपंत नेवाळे शिक्षण मंडळाच्या उपसभापतिपदी
2 कौटुंबिक न्यायालयाचे तीन महिन्यांत स्थलांतर
3 सत्कार्याला पुणेकरांची भरभरून मदत
Just Now!
X