गझल म्हणजे केवळ प्रेमकाव्य असे समजून आपण अजूनही ‘इश्कीया’ गझलच्या प्रेमामध्येच आहोत. पण, सामाजिक आशयाच्या दृष्टीने उर्दू गझल ही मराठी गझलच्या तुलनेमध्ये प्रगल्भ आहे, असे मत महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष डॉ. राम पंडित यांनी शनिवारी व्यक्त केले.
कवयित्री आणि मराठीतील पहिल्या स्त्री गझलकार संगीता जोशी यांच्या ‘उर्दू शायरीचा आस्वाद’ या ललित लेखसंग्रहपर दोन पुस्तकांचे प्रकाशन डॉ. पंडित आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. जोशी यांच्या ‘ने कुठेही वादळा’ या मराठी गझलसंग्रहाचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांच्या हस्ते तर, या संग्रहाच्या ब्रेल लिपीतील आवृत्तीचे प्रकाशन अभिनेते शरद पोंक्षे यांच्या हस्ते झाले. ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक मुकुंद संगोराम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उत्तरार्धात दत्तप्रसाद रानडे यांनी काही उर्दू आणि मराठी गझलांचे गायन केले.
पंडित म्हणाले, उत्तम काव्य, वाचन आणि श्रवणातून आस्वादन हे वैयक्तिक न ठेवता हा आनंद जोशी यांनी लेखनाद्वारे सर्वांपर्यंत पोहोचविला आहे. आपल्याला गझलमधील नजाकत, माधुर्य भावते. पण, शब्दार्थ, प्रतिकात्मकता आणि रुपक समजत नाही. हे जोशी यांनी उत्तमपणे समजावून सांगितले आहे. साहिर लुधियानवी आणि नीरज यांचे चित्रपट गीतलेखन आणि वाङ्मयामध्ये समान स्थान आहे. याउलट गुलजार आणि जावेद अख्तर हे गीतकार म्हणून लोकप्रिय असले तरी त्यांचे वाङ्मयातील स्थान लक्षणीय नाही.
गझलने मराठी माणसाला समरसून जगायला शिकविले. शब्दांना स्वरांचे अस्तर लाभते तेव्हा ते शब्द सुरातून येताना स्वत:चे वेगळेपण दाखवत नाहीत हे गझलेचे वैशिष्टय़ असल्याचे संगोराम यांनी सांगितले. गझलने भाषाभेद आणि धर्मभेद दूर केले. केशवसुत, भा. रा. तांबे आणि बा. सी. मर्ढेकर यांच्यानंतर सुरेश भट यांनी गझलेच्या प्रांतामध्ये संप्रदाय निर्माण केला, असे कुलकर्णी यांनी सांगितले.
निवांत संस्थेच्या सुचिता शिदोरे आणि सुमन राजभोर या मुलींनी ब्रेल लिपीतील जोशी यांच्या दोन गझलांचे वाचन केले. वैद्य, पोंक्षे आणि जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. मििलद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. अभिजित जोशी यांनी आभार मानले.