तुम्ही सौंदर्याचा ध्यास घ्या. हातून चांगले डिझाइन घडल्याशिवाय तुम्हाला झोप लागता कामा नये. तुमची सारी क्षमता आणि बुद्धिमत्ता महाराष्ट्राचे चांगले डिझाइन करण्यासाठी वापरा. असे करणारे तुमच्यातले दहा जण जरी निघाले तरी सार्थक झाले. तुमची बुद्धिमत्ता महाराष्ट्राच्या कल्याणासाठी उपयोगी पडो, अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी विद्यार्थ्यांना उद्देशून व्यक्त केली.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या जगन्नाथ राठी व्होकेशनल गायडन्स अँड ट्रेनिंग इन्स्टिटय़ूटच्या पदवीप्रदान कार्यक्रमात विविध अभ्यासक्रमातील गुणवंत विद्यार्थ्यांना राज ठाकरे यांच्या हस्ते पदविका प्रदान करण्यात आली. या वेळी ‘डिझाइन’ या विषयावर ठाकरे यांचे भाषण झाले. संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष विकास काकतकर, सचिव डॉ. श्रीकृष्ण कानिटकर आणि इन्स्टिटय़ूटच्या समितीचे अध्यक्ष प्रशांत गोखले या वेळी उपस्थित होते.
खरे तर मला वॉल्ट डिस्ने स्टुडिओमध्ये काम करण्याची इच्छा होती. राजकारणामध्ये अपघातानेच आलो, असे सांगून राज ठाकरे म्हणाले, जे. जे. कला महाविद्यालयामध्ये चौथ्या वर्षांला शिक्षण सोडले. मी पदवीधर नाही हे यावरून तुम्हाला समजले असेलच. व्यंगचित्रांचे बादशाह घरामध्ये असल्यामुळे मला बाहेर जावेच लागले नाही. डेव्हीड लो यांची चित्रे पाहून मी राजकीय व्यंगचित्रकार झालो. १९८६ ते १९८८ या काळात ‘लोकसत्ता’साठी मी फ्री-लान्स व्यंगचित्रकार म्हणून काम केले. आता व्यंगचित्र काढायला वेळ मिळत नाही आणि काढली तरी छापू कुठे हा प्रश्नच आहे. एकाला दिले की दुसरा नाराज होतो. त्यामुळे ज्या कल्पना सुचतात त्या थोबाडातून बाहेर पडतात. त्याने काही दुखावतात. तर, ज्याच्या विरोधात बोललो त्याचे विरोधक सुखावतात.
आपल्या शालेय अभ्यासक्रमात चित्रकला हा वैकल्पिक विषय असेल तर, मुले ‘डिझाइन’ शिकणार कुठून. हा ‘मोल्ड’ बालवयातच काढायचा असतो. राजकारण्यांची घरं, फार्म हाउस उत्तम वास्तुरचनेची होतात तशा बाहेरच्या वास्तू का नाही होत. त्यासाठी राज्यकर्त्यांनाच ‘सेन्स’ असावा लागतो. माझ्या हाती सत्ता नाही म्हणून मी हे बोलू शकतो. सध्या रस्ते, पूल ‘बीओटी’वर दिले जातात. मग, १५० वर्षे हा देश ‘बीओटी’वर द्या. म्हणजे तरी सुधारेल. देशाबद्दलचे वैफल्य वाढविणारे लोक आहेत. पण, हरून कसे चालेल. पक्षातून बाहेर पडल्यावर एक तर राजकारण सोडायचे किंवा स्वत:चा पक्ष काढायचा हे दोनच पर्याय माझ्यापुढे होते. मी राजकीय पक्ष काढला, असेही ठाकरे यांनी सांगितले.
काकतकर यांनी अध्यक्षीय समारोप केला. कानिटकर यांनी प्रास्ताविक केले. गोखले यांनी आभार मानले.
इथे कोण घडणार, भटकळ?
ऑक्सफर्ड विद्यापीठाचे नाव जगामध्ये घेतले जाते. पण, पाचव्या शतकामध्ये आपल्याकडे बिहारमध्ये नालंदा विद्यापीठ होते. तक्षशीला विद्यापीठाचा लौकिक होता. तेथे चांगले विद्यार्थी घडत होते. आता इथे कोण घडणार, भटकळ? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. ब्रिटिशांनी घडविलेल्या वास्तूंचे आपण कौतुक करतो. पण, असा वास्तूचा सौंदर्यविचार आम्ही कधी करणार, याकडे त्यांनी लक्ष वेधले.