‘गुड टच, बॅड टच’बाबत उषा काकडे यांचे मत

पुणे : मुलगा-मुलगी असा भेदभाव न करता दोघांनाही एकसारखी वागणूक देणे ही काळाची गरज आहे. वाईट प्रसंग फक्त मुलींवरच ओढवतात असे नाही, मुलांवरही अनेक प्रकारचे लैंगिक अत्याचार होतात. असा ‘नकोसा’ अनुभव आलाच, तर तो प्रसंग कसा हाताळायचा याचे शिक्षण मुले आणि मुली दोघांनाही द्यायला हवे, असे मत ‘ग्रॅव्हिट्स फाऊंडेशन’च्या उषा काकडे यांनी व्यक्त केले.

लैंगिक अत्याचारांबाबत मुलांना जागरूक करण्यासाठी उषा काकडे यांच्या ‘ग्रॅव्हिट्स फाऊंडेशन’तर्फे ‘गुड टच, बॅड टच’ हा उपक्रम शहरातील शाळांमधून राबवण्यात येत आहे. या उपक्रमासाठी ब्रिटिश पार्लमेंटतर्फे काकडे यांचा गौरवही करण्यात आला आहे.

या उपक्रमाबाबत काकडे म्हणाल्या, की दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षिततेसाठी काय करता येईल असा विचार करत असताना ‘गुड टच, बॅड टच’ या संकल्पनेवर काम करायचे ठरवले. लहान मुलांमध्ये या विषयाबाबत जागृती करण्यासाठी ही संकल्पना घेऊन शाळांकडे गेलो. विषय संवेदनशील असल्याने शाळा संभ्रमात होत्या, मात्र महिला सुरक्षेची देशातील गंभीर परिस्थिती मांडल्यानंतर शाळांनी हा प्रस्ताव स्वीकारला. त्यानंतर या उपक्रमासाठी तज्ज्ञ व्यक्तींच्या समूहाची निवड करण्यात आली. लहान मुलांशी बोलून त्यांना समजेल अशा भाषेत हा विषय समजावणे हे आव्हान होते, ते आम्ही स्वीकारले.

‘स्पर्श’ ओळखता यायलाच हवा!

महिला सुरक्षित राहायला हव्या असतील तर एखादा स्पर्श चांगला की वाईट हे ओळखता यायला हवे. ही सवय लहानपणापासूनच लागायला हवी. तेवढेच पुरेसे नाही, तर असा अनुभव आला असता त्याबाबत आपल्या आई-वडिलांशी, शिक्षकांशी बोलण्यासाठी मुलांना त्यांच्याबद्दल विश्वास वाटायला हवा. तो नसेल तर परिस्थिती गंभीर होऊ शकते, याकडेही काकडे यांनी लक्ष वेधले.

उपक्रमाचे स्वरूप :

पुण्यातल्या साडेतीनशे शाळांमध्ये रोज जाऊन एकेका वर्गातल्या मुलांशी बोलायचे, त्यांचे शंकानिरसन करायचे असे या उपक्रमाचे स्वरूप आहे. तज्ज्ञांच्या समूहाबरोबर अनेकदा मी स्वत या तासांना जाऊन मुलांचे म्हणणे ऐकते. बहुतेक वेळा मुलांशी गैरवर्तन करणारी व्यक्ती ही कुटुंबातली, अगदी जवळच्या नात्यातलीच असते. त्यामुळे मुलांनी आई-वडिलांकडे तक्रार केली तरी त्याकडे दुर्लक्षच होते. मुलांना केवळ चांगले वाईट स्पर्श ओळखायला शिकवणे पुरेसे नाही. आई-वडिलांचे प्रबोधन हा यातील सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, असेही काकडे यांनी सांगितले.