स्वाइन फ्लू झालेल्या रुग्णाला कृत्रिम श्वासोच्छवासावर (व्हेंटिलेटरवर) ठेवावे लागले की नातेवाइकांच्या मनात असलेली भीती आणखी वाढते. पण व्हेंटिलेटरवर ठेवून देखील फारसा फायदा होत नसेल तर?..रुग्णाच्या रक्तात शरीराबाहेर प्राणवायू मिसळणारी एक अत्याधुनिक यंत्रणा स्वाइन फ्लूच्या उपचारांत वापरली जात असून पुण्यात एक रुग्ण अशा यंत्रणेवर तब्बल ४४ दिवस राहिल्यानंतर बरा झाला आहे.
सर्दी-खोकला आणि त्याबरोबर श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे पुण्याचे भावेश व्होरा (वय- ४१) यांना फेब्रुवारीत औंध रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चाचण्यांमध्ये व्होरा यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांची तब्येत एका दिवसात खालावल्यामुळे पुढील उपचारांसाठी त्यांना रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्वाइन फ्लूच्या काही रुग्णांमध्ये न्यूमोनिया होऊन फुफ्फुसांमधील हवेच्या लहान पिशव्यांमध्ये पाणी तयार होते. त्यामुळे रक्तात पुरेसा प्राणवायू मिसळला जाऊ शकत नाही. व्होरा यांच्या रक्तात मिसळल्या जाणाऱ्या प्राणवायूचे प्रमाण खूपच कमी झाल्यामुळे त्यांना रक्तात शरीराबाहेर प्राणवायू मिसळणाऱ्या यंत्रणेवर ठेवण्यात आले. ‘इसीएमओ’ (एक्स्ट्रॉ कॉर्पोरिअल मेम्ब्रेन ऑक्सिजनेटर) असे या यंत्रणेचे नाव आहे.
रुबी हॉल रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाच्या प्रमुख डॉ. प्राची साठे म्हणाल्या, ‘‘या यंत्रणेत रुग्णाच्या हृदय आणि फुफ्फुसांवर कमीत कमी ताण यावा यासाठी रक्त शरीराबाहेर काढून त्यात प्राणवायू मिसळला जातो आणि ते पुन्हा शरीरात पाठवले जाते. या प्रक्रियेत जंतूसंसर्ग होण्याचा धोका अधिक असल्यामुळे त्या दृष्टीने विशेष काळजी घ्यावी लागते. हृदयाच्या बायपास शस्त्रक्रियेच्या वेळीही अशा प्रकारे रक्तात शरीराबाहेर प्राणवायू मिसळला जातो. पण तेव्हा ती प्रक्रिया केवळ काही तासांसाठी केली जाते. या स्वाइन फ्लूच्या रुग्णाला मात्र ४४ दिवस या यंत्रणेवर ठेवावे लागले. आता रुग्ण बरा झाला असून त्याला दोन- तीन दिवसांत घरी सोडले जाईल.’’
ही यंत्रणा पुण्यात सध्या रुबी हॉल आणि दीनानाथ रुग्णालयामध्ये उपलब्ध आहे, परंतु ती अद्याप प्रचंड खर्चिक आहे. या यंत्रणेवर रुग्णाला ठेवण्याचा एक दिवसाचा खर्च २० ते २५ हजार रुपयांपर्यंत येऊ शकतो, असेही डॉ. साठे म्हणाल्या.

नाकात घालायची लस
निम्म्या किमतीत मिळणार
स्वाइन फ्लूच्या प्रतिबंधासाठीची नाकात घालायची लस मे महिन्यात निम्म्या किमतीत मिळू शकणार आहे. डॉ. साठे म्हणाल्या, ‘‘या लशीचे उत्पादन करणारी सीरम इन्स्टिटय़ूट आणि रुबी रुग्णालय यांच्यातर्फे रुग्णालयाच्या ‘व्हॅक्सिन सेंटर’मध्ये ८०० रुपयांची ही लस ४०० रुपयांत मिळू शकणार आहे.’’