पुण्यातील लाल बहादूर शास्त्री रस्त्यावरील फर्मच्या खात्यामधील इंटनरनेट बँकिंगद्वारे ऑनलाईन ४९ लाख पन्नास हजार रुपये दुसऱ्या खात्यावर हस्तांतरित झाले होते. मात्र, पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर २४ लाख रुपये त्यांना मिळाले. या प्रकरणी राज्याच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) सचिवांकडे नुकसान भरपाई मिळावी म्हणून दाखल केलेल्या दाव्यात बँकेने व मोबाईल कंपनीने नियमांचे पालन केलेले नसल्याचे आढळून आले. त्यानुसार तीन बँका आणि आयडिया कंपनीने राहिलेली रक्कम फर्मला द्यावी, असा आदेश आयटी सचिव राजेश अगरवाल यांनी दिला आहे.
लाल बाहदूर शास्त्री रस्त्यावर विश्वास कुलकर्णी यांची V.K.  Architecture ही  फर्म आहे. या फर्मचे बाजीराव रस्त्यावरील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चालू खाते आहे. या खात्यावर पन्नास लाख रुपयांचे लिमिट ठेवण्यात आले. या खात्यावरून पैसे काढण्याचे अधिकार फर्मच्या दीपाली बोकील यांना दिले होते. खात्यावर पैसे काढले किंवा भरल्यानंतर त्यांच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस येत होता. २५ जुलै २०१३ रोजी बोकील यांचे आयडिया कंपनीचे सीमकार्ड अचानक बंद पडले. त्यांनी नारायण पेठेतील आयडियाच्या एका दुकानात जाऊन कार्ड बदलून घेतले. त्यांचे नवीन कार्ड दुसऱ्या दिवशी सुरू झाल्यानंतर त्यांना फर्मच्या बँकेतील खात्यावरून ४९ लाख ५० हजार रुपये काढून घेतल्याचे समजले. त्यांनी तत्काळ फर्मचे प्रमुख कुलकर्णी यांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्याबरोबरच बँकेला कळवून विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या खात्यावरून अॅक्सीस बँक, मेरठ येथील आंध्र आणि करूर वैश्या बँकेच्या खात्यावर ही रक्कम गेली. यातील काही रक्कम काढून घेतली होती. तर, काही खात्यावर होती. ती रक्कम पुढे काढण्यास थांबविण्यात आले. त्यानुसार कुलकर्णी यांना २४ लाख ३८ हजार रुपये परत मिळाले.
ऑनलाईन फसवणूक झाल्यानंतर कोणतीही व्यक्ती माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार पाच कोटी रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळावी म्हणून राज्याच्या आयटी सचिवांकडे दावा दाखल करू शकतो. त्यानुसारच कुलकर्णी यांनी अॅड. गौरव जाचक आणि दिव्या जाचक यांच्या मार्फत आयटी सचिवांकडे अर्ज दाखल केला. यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र मुख्य शाखा, बाजीराव रस्त्यावरील  शाखा, आयडिया कंपनी, आंध्रा बँक, करूर वैश्या बँक यांना प्रतिवादी केले. यावेळी आयटी सचिवांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले. त्यावेळी बँकेने खातेदारांचे केवायसी नियन पाळले नसल्याचे दिसून आले. महाराष्ट्र बँकेने पाच लाख, आयडिया कंपनीने पाच लाख, आंध्रा बँकेने आठ लाख आणि करूर वैश्या बँकेने सात लाख रुपये एका महिन्याच्या आत परत देण्याचा आदेश दिला.

ऑनलाईन फसलेल्याला दहा हजाराचे नुकसान सोसावे लागणार
अमेरिकेत एकाद्या व्यक्तीची फसवणूक झाल्यानंतर त्या व्यक्तीला ५० डॉलर नुकसान सोसावे लागते. बाकीची राहिलेली रक्कम ही इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर अॅक्टनुसार त्या व्यक्तीला द्यावी, असा कायदा आहे. त्याच धर्तीवर भारतातही २०१४ मध्ये भारतीय रिझव्र्ह बँकेने नुकसान भरपाई मिळण्यासाठी बँकिंग कोड्स अॅन्ड स्टॅन्डर्ड बोर्ड ऑफ इंडिया (बीसीएसबीआय) ची निर्मिती केली आहे. त्यानुसार भारतात ऑनलाईन फसवणूक झालेल्या व्यक्तीला फसवणूक झालेल्या रकमेपैकी दहा हजार रुपये नुकसान सोसावे लागेल. बाकीची रक्कम ही त्याला संबंधित दोषी असलेल्यांनी द्यावी, असे निर्देष दिले आहेत. याच कोड्सचा आधार दिल्यानंतर आयटी सचिवांनी नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला, असे अॅड. गौरव जाचक यांनी सांगितले.