राज्यातील अडीच हजारांहून अधिक महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या रिक्त जागा असल्याचे स्पष्ट झाले आहे. उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील एकूण २ हजार ६३९ महाविद्यालयांनी रिक्त जागांची माहिती भरली असून १२५ महाविद्यालयांनी प्रतिसाद दिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

उच्च शिक्षणातील गुणवत्ता वाढीसाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उच्च शिक्षण संस्थांतील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील उच्च शिक्षण संस्थांना प्राध्यापक भरतीसाठी रिक्त जागांची माहिती नॅशनल हायर एज्युकेशन रिसोर्स सेंटरच्या (एनएचइआरसी) संकेतस्थळावर भरण्याचे आदेश दिले. माहिती भरणे ते प्राध्यापक नियुक्ती यासाठी सहा महिन्यांची मुदत ठरवून देण्यात आली होती.

राज्याच्या उच्च शिक्षण संचालनालयाने राज्यातील महाविद्यालये, विद्यापीठांना रिक्त जागांची माहिती भरण्याच्या कार्यवाहीचे निर्देश दिले होते. त्यानंतर यूजीसीने माहिती भरण्यासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती.

उच्च शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, संकेतस्थळावर एकूण ३ हजार ४८६ महाविद्यालये आणि विद्यापीठांनी माहिती भरली आहे. त्यातील ८०१ महाविद्यालये तंत्रशिक्षण संचालनालयाशी संलग्न आहेत. तर उच्च शिक्षण संचालनालयाशी राज्यातील ३ हजार ७७ महाविद्यालये, विद्यापीठे संलग्न आहेत. त्यातील २ हजार ६३९ महाविद्यालयांतील रिक्त जागांच्या संदर्भातील माहिती भरली आहे.

यात महाविद्यालये आणि विद्यापीठांतील विभागांचाही समावेश आहे. तर १२५ महाविद्यालयांनी काहीच प्रतिसाद दिलेला नाही. तर ऑल इंडिया सव्‍‌र्हे फॉर हायर एज्युकेशनचा (एआयएसएचई) कोड नसूनही ४६ महाविद्यालयांनी माहिती भरली आहे. २ हजार ८०४ महाविद्यालयांनी पूर्ण माहिती भरल्याचा अहवाल दिला आहे. माहिती भरलेल्या महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या एकूण रिक्त जागांची आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही.

माहिती न भरलेल्या १२५ महाविद्यालयांमध्ये काही महाविद्यालये बंद झालेली, विद्यापीठांची संलग्नता नसलेली असण्याची शक्यता आहे.

– डॉ. धनराज माने, उच्च शिक्षण संचालक