News Flash

– नारायण पेठेतील जमीन शहरात सर्वात महाग

मोकळ्या जमिनीचे दरही जाहीर करण्यात आले असून, या दरांमध्ये नव्याने विकसित होत असलेल्या भागांना मागे टाकत पेठांनी आघाडी घेतली आहे.

रेडी रेकनरचे (वार्षिक बाजार मूल्य) नवे दर जाहीर करताना बांधकामांच्या दरांबरोबरच मोकळ्या जमिनीचे दरही जाहीर करण्यात आले असून, या दरांमध्ये नव्याने विकसित होत असलेल्या भागांना मागे टाकत पेठांनी आघाडी घेतली आहे. कोरेगाव पार्क व एरंडवणा भागात सदनिकांचे दर सर्वाधिक असले, तरी शहरातील जमिनींच्या दरांचा विचार केल्यास नारायण तसेच सदाशिव पेठेतील जमिनीचा दर सर्वाधिक आहे.
नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक एन. रामस्वामी यांनी वार्षिक बाजार मूल्य तक्ते नुकतेच जाहीर केले. त्यात जमिनींचे विभागवार दरही जाहीर करण्यात आले. रेडी रेकनरच्या वाढीव दरांमुळे तयार बांधकामांचे दर वाढत असल्याचे स्पष्ट असले, तरी जमिनींच्या दर वाढीमुळेही तयार बांधकामांचे दर वाढत असतात. त्यामुळे रेडी रेकनरमधील जमिनींच्या दरांनाही महत्त्व आहे. शहरातील विविध पेठांमध्ये जमिनीचे दर शहरातील इतर भागांपेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे. पेठांच्या गजबजलेल्या भागांमध्ये मोकळ्या जमिनी नसल्या, तरी सध्या जुने वाडे किंवा जुनी बांधकामे तोडून नव्या इमारती बांधल्या जात आहेत. त्यामुळे या पेठांमध्ये जमिनींचे दरही वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रेडी रेकनरनुसार जमिनीचा शहरातील सर्वाधिक दर नारायण पेठेत आहे. अप्पा बळवंत चौक- कन्याशाळा- केसरीवाडा- टिळक चौक- विजय टॉकीज- भानुविलास चौक, उंबऱ्या गणपती चौक- कुंटे चौक या चतु:सीमेत असलेल्या नारायण पेठेत प्रतिचौरस फूट ८,२४९ रुपये जमिनीचा दर आहे. त्या पाठोपाठ सदाशिव पेठ व नवी पेठेत जमिनीचा दर प्रतिचौरस फूट ८,०७७ रुपये आहे. बुधवार पेठेत साडेसात हजारांहून अधिक दर असून, रविवार पेठ, शनिवार पेठ, गणेश पेठ, कसबा पेठ आदी भागांमध्येही प्रतिचौरस फूट सहा हजारांच्या आसपास जमिनींचा दर आहे. शिवाजीनगर भागामध्येही सात हजारांहून अधिक रुपये दर आहे.
सदनिकांच्या दरामध्ये पुण्यात कोरेगाव पार्क (घोरपडी), एरंडवणा आदी भाग सर्वात महागडे ठरले आहेत. कोरेगाव पार्क भागात सदनिकांचे प्रतिचौरस फूट दर १३ हजार ३०० रुपयांहून अधिक आहेत. मात्र या ठिकाणच्या जमिनीचे दर पाहिल्यास ते प्रतिचौरस फूट ४,९७५ रुपये आहेत. शहरातील दुसरा महागडा भाग असलेल्या एरंडवणा येथे जमिनीचा दर ५,९२८ रुपये असल्याचे रेडी रेकनरमधून स्पष्ट होते. या महागडय़ा भागांपेक्षा पेठांतील जमिनी मात्र भाव खाऊन जात आहेत.

बांधकाम व जमिनीच्या दरात फार तफावत नाही

नारायण पेठेसह शहराच्या मध्यवर्ती भागात अनेक ठिकाणी जमिनीचा दर मोठा असला, तरी प्रतिचौरस फूट बांधकामाचा दर व जमिनीच्या दरांमध्ये फार मोठा फरक नसल्याचेही समोर आले आहे. नारायण पेठेत जमिनीचा प्रतिचौरस फूट दर ८,२४९ रुपये आहे, तर निवासी बांधकामाचा जास्तीत जास्त दर ८,४६७ रुपये आहे. बुधवार पेठेत जमिनीचा दर ७,६२८ रुपये असून, बांधकामाचा दर ७,७०० रुपये आहे. अशीच काहीशी स्थिती सदाशिव व नवी पेठ भागाबाबतही आहे. या ठिकाणी जमिनीचा प्रतिचौरस फूट दर आठ हजार रुपये आहे, तर बांधकामाचा दर ९,९०० रुपये आहे. पेठांमध्ये मोकळ्या जमिनी क्वचितच सापडतील, पण वाडे व जुने बांधकाम पाडून झालेले जमिनीचे व्यवहार मोठय़ा रकमेचे असल्याने त्यानुसार रेडी रेकनरचे दर ठरले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2016 3:25 am

Web Title: vacant land rates in narayan peth at the top
Next Stories
1 लक्ष्मी-वासुदेव कलाभूषण पुरस्कार पं. जसराज यांना जाहीर
2 स्वाइन फ्लू अर्थसाहाय्य योजनेचा विस्तार वाढवला
3 माथाडी कायद्यातील बदलाच्या विरोधात उपोषण
Just Now!
X