अतिवृष्टीचा जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मंगळवार ६ ऑगस्ट रोजी देखील सुट्टी जाहीर केली आहे.  या अगोदर  जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सोमवारी देखील सुट्टी जाहीर केली होती.

जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा आणि जुन्नर या तालुक्यात अतिवृष्टी होत आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांना अतिवृष्टीचा त्रास होऊ नये, म्हणून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मंगळवारी ६ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. शिवाय नागरिकांना आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचेही आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा दक्ष असून,नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मुठा नदीपात्र तुडूंब भरलेले असल्याने ते पाहण्यासाठी पुणेकर दोन दिवसांपासून शहरातील पूलांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. शिवाय या मार्गाने जाणारी वाहनं देखील या ठिकाणी काही वेळ थांबत असल्याने, पूलावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसत आहे. हे पाहता प्रशासनाकडून नागरिकांनी पूलांवर जाणे टाळावे असे सांगण्यात आले आहे. शिवाय दक्षतेचा उपाय म्हणून शहरातील महादजी शिंदे पूल औंध, राजीव गांधी पूल औंध, जुनी सांगावी पूल औंध, दापोडी बोपोडी येथील भाऊ पाटील रोड, जुना होळकर पूल, बाबा भिडे पूल आणि टिळक पूल हे सात पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.

हवामान खात्याने पुण्यात पुढील काही काळात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.  सोमवारी  बाणेर भागात पावसाच्या पाण्यामुळे इमारतीत अडकलेल्या नागरिकांची एनडीआरएफच्या जवानांनी सुटका केली. आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे. शिवाय शहराला पाणीपुरवठा करणारी धरण देखील तुडूंब भरली असल्याने, मोठ्याप्रमाणात विसर्ग सुरू आहे. नदीपात्रालगतच्या शेकडो रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. तर, महापौर मुक्ता टिळक यांनी पुणेकरांना शक्यतो घराबाहेर पडू नका असे आवाहन केले आहे.