पुणे : लोकसंख्येच्या प्रमाणात राज्यात लसीकरणात पुणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील २५ लाख ६५ हजार ७९० नागरिकांना पहिली आणि दुसरी मात्रा देण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील ११ लाख ४० हजार ७९० नागरिक, पुणे महापालिका क्षेत्रातील साडेनऊ लाख, तर पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील चार लाख ७५ हजार नागरिकांचा समावेश आहे.

याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले,की लोकसंख्येच्या प्रमाणात राज्यात चार जिल्ह्यांत चांगले लसीकरण झाले आहे. त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, पुणे आणि सातारा या चारही पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात मिळून १८ पेक्षा जास्त वयोगटाची लोकसंख्या एक कोटी १७ लाख ४८ हजार आहे. म्हणजेच एवढ्या लोकसंख्येचे लसीकरण करायचे आहे. ४५ पेक्षा जास्त वयोगटाच्या नागरिकांपैकी ४८ टक्के  नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. ४५ पेक्षा जास्त वयोगटाची लोकसंख्या ३५ लाख २४ हजार ५९१ एवढी आहे. यापैकी पहिली मात्रा घेतलेले १९ लाख ५८ हजार, तर दुसरी मात्रा घेतलेले पाच लाख ६६ हजार नागरिक असून एकू ण २५ लाख २४ हजार जणांना लशीची पहिली किं वा दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, ६० पेक्षा जास्त वयोगटाच्या नऊ लाख ९५ हजार ७५० नागरिकांचे लसीकरण करायचे आहे. यापैकी सात लाख ८० हजार नागरिकांना लशीची पहिली मात्रा दिली असून हे प्रमाण ८० टक्के  आहे. दुसरी मात्रा दोन लाख १५ हजार ७५० नागरिकांना देण्यात आली असून हे प्रमाण २७ टक्के  एवढे आहे, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.