हॉटेलसाठी नेहमीचे पदार्थ तयार करताना आणि ते ग्राहकांना देताना पदार्थाची पारंपरिक चव टिकवणं हे खूप महत्त्वाचं असतं. ती थोडी जरी बिघडली तरी खवय्यांची दाद मिळत नाही. त्याबरोबरच खाद्यपदार्थाचा व्यवसाय करताना नवीन काही तरी करून बघणंदेखील आवश्यक असतं. सौरभ पारखे यांना अशी नावीन्याची आवड आहे. त्यातून आणि वेगवेगळ्या अनुभवांमधून, निरीक्षणांमधून, खवय्येगिरीतून त्यांना कल्पना सुचतात. मग त्या कल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी ते अनेक प्रकारे पदार्थ तयार करून बघतात. त्यात त्यांचा हातखंडा आहे.

सौरभ पारखे यांची खरी ओळख कलावंत अशी. पण नाटय़, चित्रपटसृष्टी आणि हिंदूी-मराठी मालिकांची सृष्टी गाजवत असलेला हा कलाकार उत्तम खवय्या आणि उत्तम स्वयंपाकीदेखील आहे, हे ‘श्री वडोबा’मध्ये गेल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. सौरभचं बालपण गावात म्हणजे मध्य पुण्यात गेलं. बुधवार पेठेतील वैद्य मिसळीच्या वरच्या मजल्यावर नूतन भारत मराठी विद्यालय ही शाळा भरायची. सौरभ तिथे चौथीपर्यंत होता. घरी काही पदार्थ बनवून बघण्याची त्याची आवड बालपणापासूनची. हे पदार्थ बनवताना कधी पोहे करपायचे तर कधी वाटी जळायची. अर्थात असे धडे घेत घेतच सौरभ उत्तमोत्तम खाद्यपदार्थ बनवण्यात प्रवीण झाला. पुढे महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच अभिनय आणि त्यातून नाटय़ व चित्रपटसृष्टीत त्याचा जम बसला. अभिनय, लेखन, दिग्दर्शन यासह नाटय़सृष्टीतली अनेक पारितोषिकंही त्यानं मिळवली. मात्र खाणं आणि खिलवण्याची मूळची आवड असल्यामुळे या क्षेत्रातही काही तरी करून दाखवण्याची त्याची मनोमन इच्छा होती आणि त्यातून सुरू झालं ‘श्री वडोबा.’

वडोबाचं वैशिष्टय़ं सात शब्दांमध्ये सांगायचं तर ‘अकरा प्रकारचे बटाटेवडे आणि सात प्रकारची मिसळ’ असं सांगता येईल. एकाच प्रकारचा आणि चवीचा बटाटेवडा जिथे मिळतो, तिथे दुसऱ्या चवीचा वडा हवा असेल त्यांनी काय करायचं, या प्रश्नाला उत्तर वडोबा हे आहे. नेहमीचा मसालेदार आणि चटकदार बटाटेवडा हे इथलं वैशिष्टय़ं आहेच, शिवाय हळद न वापरता केलेला आणि आंबड, गोड, तिखट चवीचा कोकणी वडाही इथे मिळतो. उपवासाची बटाटा भाजी, ओलं खोबरं वापरून तयार होणारा उपवासाचा बटाटेवडा, लाल मिरचीची पावडर वापरून केला जाणारा रेड चिली बटाटेवडा, कोबी, गाजर, शेजवान सॉस वगैरेचा वापर असलेला चायनीज वडा हे इथले आणखी काही खास बटाटेवडे. एकदा एका ग्राहकाने येऊन जुनी आठवण सांगितली, की पूर्वी कापलेला टोमॅटो फ्राय करून तो बटाटेवडय़ात वापरायचे. झालं. लगेच सौरभ यांनी त्या ग्राहकापुढेच तो प्रयोग केला आणि त्या प्रयोगातून मसाला टोमॅटो बटाटेवडा तयार झाला. उडीद बटाटेवडा, मूग बटाटेवडा आणि डाळ बटाटेवडा हे इथले आणखी काही मस्त आणि आवर्जून घ्यावेत असे वडय़ांचे प्रकार. हे तीन वडे विशिष्ट पद्धतीच्या चटणी आणि सांबारबरोबर खायचे असतात. या वडय़ांबरोबर खाण्याची ही चटणीदेखील वडोबाची खासियत आहे.

आता थोडं सात प्रकारांच्या मिसळींबद्दल. एकाच चवीची मिसळ देण्याऐवजी त्यातही वैविध्य हवे ही सात मिसळींमागची संकल्पना. त्यातही स्पे. निखारा दम मिसळ हा अलीकडेच आलेला नवा प्रकार. शिवाय कोल्हापुरी, पुणेरी, जैन आणि उपवास मिसळ हेही प्रकार इथे आहेतच. कोल्हापुरी आणि पुणेरी या दोन्ही मिसळी पूर्ण भिन्न. पुणेरी मिसळीत नॉयलॉन पोह्य़ांचा चिवडा आणि शेव, तसंच मटकी, बटाटा भाजी, पोहे हे घटक पदार्थ असतात आणि या मिसळीसाठी हिरव्या मसाल्याचा रस्सा तयार केला जातो. तर कोल्हापुरी मिसळीत फरसाण, भाजी, पोहे, मटकीवर खास झणझणीत कोल्हापुरी रस्सा. मिसळीतील सर्व घटक पदार्थ र्तीमध्ये फ्राय करून दिली जाणारी मिसळ फ्राय ही डिशदेखील सौरभ यांनीच तयार केलेली आहे. आपण सांगू ते कॉम्बिनेशनही आपल्याला मिसळीत करून दिलं जातं. त्या मिसळीचं नाव आहे ‘स्व’इच्छा मिसळ. या प्रत्येक मिसळीची चव वेगवेगळी आहे.

एखादा पदार्थ मनात आला की सौरभ पारखे यांना स्वस्थ बसवत नाही. मग वेगवेगळे प्रकार एकत्र करून तो पदार्थ मनासारखा होईपर्यंत त्यांचे प्रयोग सुरू राहतात. त्यातून खवय्यांना निश्चित आवडतील असे अनेक खाद्यप्रकार तयार होतात. इथलं मसाला ताक आणि मारवाडी छास हे प्रकारही असेच आगळे वेगळे आहेत. शिवाय जैन वडा, जैन मिसळ हे प्रकारही खास जैन खासियत टिकवणारे आहेत आणि म्हणूनच ते लोकप्रिय झाले आहेत. वडोबाच्या शाखा आता उंड्री, बावधन आणि चिंचवडमध्येही सुरू होत आहेत. शिवाय सध्याच्या ‘वडोबा’मध्ये इतरही अनेक पदार्थ लवकरच सुरू होणार आहेत. तत्पूर्वी एकदा सध्याच्या वडोबाला भेट द्याच.

कुठे आहे ?

  • वडोबा, शॉप नं. ९
  • गगन गॅलेक्सी, गंगाधाम फेज २ समोर
  • बिबवेवाडी-कोंढवा रस्ता
  • सकाळी आठ ते रात्री दहा