नळाला पाणीच येत नसल्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नातेवाइकांना हापशावरून पाणी आणावे लागत आहे. सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे हे दृश्य गेल्या आठवडय़ाभरापासून दिसत असून लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत गुंतलेल्या महापालिका प्रशासनाने या पाणीप्रश्नाकडे पाठ फिरविली आहे.
वैकुंठ स्मशानभूमी येथील विद्युतदाहिनी परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे पुणेकरांचे प्रचंड हाल होत आहेत. पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी अंघोळ करण्यासाठी पाणी नाही. पाणी नसल्यामुळे स्मशानभूमीतील सोलर सिस्टिम बंद पडली आहे. अंत्यविधी करताना आचमन करण्यासाठी पाणी मिळत नाही. तर, अंत्यविधी झाल्यानंतर नातेवाइकांना हात-पाय धुण्यासाठी नळाला पाणी येत नाही. येथे येणाऱ्या नातेवाइकांना पिण्याच्या पाण्यासाठी बसविण्यात आलेला कुलर पाण्याअभावी बंद पडला आहे. एवढेच नव्हे तर, अंत्यविधी सुरू असताना माठामध्ये पाणी भरण्यासाठी नातेवाइकांना चक्क हापसा गाठावा लागत आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून विविध राजकीय पक्षांकडून जाहीर आश्वासने दिली जात आहेत. मात्र, गेल्या आठवडय़ात एकाही राजकीय नेत्याला स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी यावे लागले नसल्याने येथील पाण्याचा प्रश्न कोणाच्याच ध्यानात आलेला नाही. तर, महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्षच झाले आहे.
वैकुंठ स्मशानभूमीला दोन ठिकाणहून पाणीपुरवठा होतो. विद्युतदाहिनी परिसराला पाणी येणाऱ्या वाहिनीमध्ये बिघाड झाला असल्याने या भागातील १५ नळांना पाणीच येत नाही. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नातेवाइकांची पंचाईत झाली असून त्यांच्या कोणत्याही प्रश्नाला नीटपणाने उत्तर मिळत नाही अशी अवस्था असल्याचे एका जागरूक नागरिकाने सांगितले. टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली आहे. मात्र, अद्याप जलवाहिनीच्या दुरुस्तीचा मुहूर्त केव्हा लागणार याची प्रतीक्षा आहे. ‘घरातून निघताना पाण्याच्या दोन बाटल्या बरोबर घेतो किंवा बिसलरी बाटली विकत घेतो’, असे अजित मोघे गुरुजी यांनी सांगितले. या स्मशानभूमीत सहा महिन्यांपूर्वी बोअरवेल खणण्यात आली असून त्यावर हापसा उभारला आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी नातेवाईक हापशावरून पाणी आणून हा प्रश्न सोडवीत आहेत.