हॉटेल श्रेयसमधील मुक्काम.. ग्राहक पेठेच्या दालनाचे उद्घाटन.. जुन्या-नव्या पिढीच्या कार्यकर्त्यांशी घनिष्ठ संबंध.. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीनिमित्ताने झालेल्या जाहीर सभा.. स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्याशी असलेला स्नेह.. महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर आणि ज्येष्ठ संगीतकार-गायक सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेचा आविष्कार असलेल्या ‘गीतरामायणा’च्या रौप्यमहोत्सवी आणि सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमास उपस्थिती.. हे आणि असे अनेक प्रसंग वाजपेयींच्या पुण्यावरील अटल प्रेमाची साक्ष देतात.

पंतप्रधान होण्यापूर्वीची दोन दशके पुण्यात आल्यानंतर वाजपेयी यांचा मुक्काम डेक्कन जिमखाना परिसरातील आपटे रस्त्यावरील हॉटेल श्रेयस येथे असायचा. हॉटेलचे मालक बाळासाहेब चितळे हे त्यांचे संघ वर्गातील सहकारी. त्यामुळे श्रेयसमध्ये असताना अटलजी घरामध्ये असल्यासारखेच वावरायचे. बिंदुमाधव जोशी आणि सूर्यकांत पाठक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘ग्राहक पेठ’च्या दालनाचे उद्घाटन अटलजींच्या हस्ते झाले होते. अटलजींच्या ‘मेरी ईक्क्य़ावन्न कविताएँ’चा पुण्यातील भाजपचे नेते डॉ. अरिवद लेले यांनी ‘गीत नवे गातो मी’ हा मराठी अनुवाद काव्यप्रेमींच्या ध्यानात आहे. पक्षाच्या अधिवेशनानिमित्त अटलजी दोन-तीनदा पुण्यात आले होते. स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्याशी त्यांचा स्नेह होता. त्यामुळेच पंडितजींच्या कल्पनेतून साकारलेल्या सवाई गंधर्व स्मारकाच्या उद्घाटनासाठी अटलजी पंतप्रधान या नात्याने उपस्थित होते. लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनतर्फे उभारण्यात आलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे उद्घाटन अटलजींच्या हस्ते झाले होते.

डेक्कन जिमखान्यावरील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन अटलजी यांच्या हस्ते झाले होते. शहरी भागातील संभाजी महाराज यांचा हा पहिला पुतळा असल्याचे अटलजी यांनी आपल्या भाषणात सांगितले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक प्रा. राजेंद्रसिंहजी ऊर्फ रज्जूभैया आणि भारतीय मजदूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांच्या अंत्यसंस्काराला पंतप्रधान वाजपेयी उपस्थित होते. ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांच्या निधनानंतर वाजपेयी यांनी मृणालिनी सावंत यांना पाठविलेल्या सांत्वनपर पत्रामध्ये सावंत यांच्या ‘युगंधर’ या कलाकृतीचा गौरव केला होता. ‘गीतरामायण’चा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल येथे झाला होता. या कार्यक्रमात आपल्या ओघवत्या शैलीत अटलजी यांनी रामायणाचे महत्त्व उलगडले होते. तर, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे झालेल्या ‘गीतरामायण’च्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमास पंतप्रधान वाजपेयी आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमातील त्यांचे भाषण गाजले होते. पुण्यावर वाजपेयी यांचे अटल प्रेम होते. पुण्यातून दिल्ली येथे भेटावयास गेलेल्या कार्यकर्त्यांची ते आत्मीयतेने चौकशी करीत असत. पुण्यातील पूर्वीच्या कार्यक्रमांची ते आवर्जून आठवण काढत असत.