चित्रपटातील प्रेम कहाणी सत्यात उतरणं तसं कठीणच. परंतु,पिंपरी-चिंचवडमधील एका जोडप्याच्या बाबतीत मात्र हे तंतोतंत खर ठरलं आहे. ‘सिर्फ तू’ या चित्रपटात ज्याप्रकारे एका फोन कॉलवरून प्रेम जुळते तसेच या दोघांच्या बाबतीत झाले आहे. मीना आणि शैलेंद्र याची ही प्रेमकहाणी असून चुकीने लागलेल्या एका फोन कॉलमुळे त्यांनी सात जन्माच्या गाठी बांधल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांचे प्रेम जुळल्यानंतर त्यांनी एकमेकांना तब्बल एक वर्ष प्रत्यक्षात पाहिले नव्हते. मात्र तरीही त्यांचे प्रेम यशस्वी ठरले आणि त्यांनी लग्नही केले. त्यांच्या लग्नाला आता ९ वर्षे पूर्ण झाली असून त्यांच्या संसारवेलीवर एक फूलही फुलले आहे.

मीना या मूळ परळी येथील असून महाविद्यालयीन जीवनात त्या शिक्षणासाठी बीडमध्ये आल्या होत्या. त्यावेळी काही कारणाने मैत्रीणीच्या होणाऱ्या नवऱ्याला फोन करताना अचानक राँग नंबर लागला. हा फोन चुकून पिंपरी-चिंचवडमधील शैलेंद्र यांना लागला. त्यांनी हा राँग नंबर असल्याचे सांगितले, शैलेंद्र यांची रिंग टोन ही ‘बेखुदी की जिंदगी जिया नही’ करते अशी होती. मीना यांना ही टोन आवडल्याने त्यांनी शैलेंद्र यांना पुन्हा फोन करुन आपल्याला ची टोन आवडल्याचे सांगितले.

त्यानंतर शैलेंद्र यांनी मीना यांना एकामागे एक मेसेज करण्यास सुरुवात केली. त्यांची ओळख वाढत गेली आणि तिचे मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. प्रेम जुळल्यानंतर सहा महिन्यांनी शैलेंद्र यांनी आपला फोटो कुरिअर करून पाठवला. पहिल्या भेटीसाठी दोघांनी बरेच प्रयत्न केले. अखेर जालना येथे मीना यांनी शैलेंद्रला रेल्वे स्थानकावर बोलवून घेतले. त्यानंतर एक वर्षाने मीना पुण्यात आल्या. मग शैलेंद्र यांच्याबद्दल घरच्यांना कुणकुण लागली, मात्र घरच्यांनी शैलेंद्र यांच्या दिसण्यावरून लग्नाला विरोध केला. मात्र दोघेही आपल्या निर्णयावर ठाम असल्याने अखेर घरच्यांनी लग्नाला परवानगी दिली. आज त्यांच्या लग्नाला नऊ वर्ष होत असून त्यांना युवराज नावाचा गोंडस मुलगा आहे.