एसएनडीटी जलकेंद्रामधील टाक्याचे व्हॉल्व्ह उघडणारी व बंद करणारी स्वयंचलित यंत्रणाच गायब झाली असून त्यामुळे महापालिका कारभाराचा आणखी एक नमुना उघडकीस आला आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या हलगर्जी आणि निष्काळजीपणाचाच हा नमुना असून नागरिकांचे लाखो रुपये वाया घालवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईच झाली पाहिजे, अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
एसएनडीटी जलकेंद्रामध्ये सुमारे दोन लाख रुपये खर्च करून ही यंत्रणा बसवण्यात आली होती. तेथील टाक्यांचे व्हॉल्व्ह उघडणे व बंद करणे ही कामे कर्मचाऱ्यांतर्फे केली जात होती. मात्र, हे काम अवघड आणि कष्टप्रद असल्यामुळे व्हॉल्व्ह उघडणारी व बंद करणारी दोन स्वयंचलित यंत्रे या केंद्रासाठी खरेदी करण्यात आली होती. त्यातील एखादे यंत्र बंद पडल्यास आयत्या वेळच्या उपयोगासाठी एक अतिरिक्त यंत्रही खरेदी करण्यात आले होते. प्रत्यक्षात या तीन यंत्रांमधील फक्त एक यंत्र चारपाच दिवस चालले आणि आता तिन्ही यंत्र गायब झाली आहेत, अशी माहिती सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर, जुगल राठी आणि विश्वास सहस्रबुद्धे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 या यंत्रांमुळे मनुष्यबळाची तसेच वेळेची बचत होणार होती. मात्र, ही यंत्रणा थ्री फेज विद्युत जोडणीवरच चालते हे माहिती असूनही एचएलआर टाकी येथे ही व्यवस्थाच करण्यात आली नव्हती. त्यामुळे तेथे ही यंत्रणा गंजून विनावापर पडली होती. ही तिन्ही यंत्रे आता वापरात नाही. तसेच ती कोठे आहे याचीही माहिती संबंधित अधिकारी देत नाहीत. ही यंत्रे खरेदी करूनही कार्यान्वित न झाल्यामुळे जी रक्कम वाया गेली त्याबाबतही अधिकारी निष्काळजी आहेत, असे वेलणकर म्हणाले.
पुणेकरांच्या पैशांचा अशा पद्धतीने अपव्यय करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होणे आवश्यक आहे, अशा मागणीचे पत्रही सजग नागरिक मंचने बुधवारी आयुक्तांना दिले आहे. वापर न करताच ही यंत्रणा नादुरुस्त झाली असून ती का कार्यान्वित करण्यात आली नाही, याचीही चौकशी झाली पाहिजे, असे संघटनेचे म्हणणे आहे.