मांजर मारहाण प्रकरणी राष्टवादीच्या वंदना चव्हाण यांची माहिती
भ्रष्टाचार केल्याचे आरोप करणाऱ्या विजय नावडीकर यांच्यामुळे मला व कुटुंबीयांना नाहक त्रास झाला आहे. त्यामुळे नावडीकर यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार आहे. नावडीकर यांनी ५ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याची नोटीस त्यांना बजाविण्यात आली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहाराध्यक्ष व खासदार वंदना चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
नावडीकर यांनी पाळलेल्या सात, आठ मांजरांपासून त्रास होत असल्याची तक्रार सदाशिव पेठेतील यशोधन अपार्टमेंटमधील सहा सदनिकाधारकांनी १२ डिसेंबर २०१२ रोजी महापालिकेच्या विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयात दिली होती. विश्रामबाग पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारअर्ज देण्यात आला होता. नावडीकर यांनी पाळलेल्या मांजरांमुळे आरोग्यास हानिकारक परिस्थिती निर्माण झाल्याचे सदनिकाधारकांनी या तक्रारीत नमूद केले होते.
अद्याप तक्रारीवर कोणतीही कार्यवाही झालेली नसताना नावडीकर यांनी मी मांजरांना मारहाण केल्याचा आरोप केला आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.
महापालिकेकडे रहिवाशांनी केलेल्या तक्रारीनुसार महापालिका अधिकारी, पोलीस व प्राणिकल्याण अधिकारी सुप्रिया बोस व मनोज ओसवाल यांनी अहवाल दिला आहे. आमचा मांजरांना विरोध नाही, मात्र माझ्या कुटुंबीयांवर दबाव टाकण्यासाठी नावडीकर यांनी न्यायालयात मी मांजरांना मारहाण केल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे नावडीकर यांच्याविरुद्ध न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार आहे. नावडीकर यांनी दिलेल्या त्रासामुळे नाहक मनस्ताप झाला आहे. आमची बदनामी झाली आहे. त्यासाठी त्यांच्याकडून ५ कोटी रुपये नुकसानभरपाईची मागणी करण्यात येणार आहे. तशी नोटीस त्यांना बजाविण्यात आली आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.