सत्तेचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे हीच भूमिका घेऊन मी पक्षात काम करत आहे आणि राष्ट्रवादी हे आपले सर्वाचे कुटुंब आहे असे मी मानते. या कुटुंबासाठी सर्वानी योगदान द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांनी मंगळवारी केले. सर्वाना बरोबर घेऊन पक्ष बळकट करणे हेच माझे उद्दिष्ट आहे, असेही त्या म्हणाल्या.
शहराध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाल्यानंतर वंदना चव्हाण यांनी मंगळवारी शहर कार्यालयात जाऊन अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. महापौर वैशाली बनकर, स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे, नगरसेविका नंदा लोणकर, तसेच अॅड. म. वि. अकोलकर, शशिकला कुंभार, रजनी पाचंगे, पंडित कांबळे यांची या वेळी भाषणे झाली. वंदना चव्हाण यांची राजकारणातील स्वच्छ व नि:स्पृह प्रतिमा, त्यांचे पर्यावरणप्रेम, अभ्यासू वृत्ती यांचा वक्त्यांनी आवर्जून उल्लेख केला. रवी चौधरी, अमेय जगताप, डॉ. अमोल देवळेकर, संजय गाडे, योगेश वराडे, श्रीराम टेकाळे, विद्या खळदकर आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. अनेक कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष चव्हाण यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
पुणे शहराच्या विविध प्रश्नांवर काम करताना कार्यकर्त्यांनी योग्यप्रकारे साथ दिली असून तशीच ती पुढेही मिळावी, अशी अपेक्षा चव्हाण यांनी या वेळी व्यक्त केली. सर्व कार्यकर्त्यांना पक्षासाठी काम करण्याचे आवाहन करतानाच सर्वाना बरोबर घेऊन काम करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.