30 March 2020

News Flash

‘वन्दे मातरम्’च्या जयघोषाने केसरीवाडा दुमदुमला..

... त्या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला स्वातंत्र्यलढय़ातील क्रांतिकारकांच्या वंशजांचे सत्कार केसरीवाडय़ात केले जात होते आणि उपस्थित प्रत्येकाच्या अंगावर सत्कार होताना अक्षरश: रोमांच उभे राहात होते.

| June 15, 2014 02:55 am

लोकमान्य टिळकांच्या केसरीवाडय़ाचे प्रांगण शनिवारी संध्याकाळी ‘वन्दे मातरम्’ आणि लोकमान्यांच्या जयजयकाराने दुमदुमून गेले. मंडालेतून सुटून लोकमान्य पुण्यात आले त्या घटनेची शताब्दी रविवारी साजरी होत आहे. त्या सोहळ्याच्या  पूर्वसंध्येला स्वातंत्र्यलढय़ातील क्रांतिकारकांच्या वंशजांचे सत्कार केसरीवाडय़ात केले जात होते आणि उपस्थित प्रत्येकाच्या अंगावर सत्कार होताना अक्षरश: रोमांच उभे राहात होते.
मंडाले येथून सुटका झाल्यानंतर १५ जून १९१४ रोजी लोकमान्य टिळक पुण्यात पोहोचले. या ऐतिहासिक घटनेची शताब्दी रविवारी (१५ जून) साजरी होत आहे. या निमित्ताने क्रांतिकारकांच्या वंशजांचा खास सन्मान केला जाणार आहे. देशाच्या विविध राज्यांमधून क्रांतिकारकांचे परिवार शनिवारी दुपारी पुण्यात पोहोचले आणि हे सर्व जण सायंकाळी केसरीवाडय़ात आले.   
केसरीवाडय़ातील कार्यक्रमात खास पुणेरी उपरणे देऊन क्रांतिकारकांच्या वंशजांचा सत्कार केला जात असताना उपस्थितांकडून ‘भारत माता की जय’ असा जयजयकार सुरू होता. वन्दे मातरम्च्याही घोषणा दिल्या जात होत्या. भगतसिंग, वासुदेव बळवंत फडके, स्वा. सावरकर, वीर चापेकर बंधू, राजगुरू, अनंत कान्हेरे, विष्णू गणेश पिंगळे, रामसिंग कुका, अशफाक उल्ला खान, महावीर सिंग आदी अनेक क्रांतिकारकांचे परिवार या कार्यक्रमात उपस्थित होते आणि या सर्वाच्या सत्काराचा हृद्य सोहळा केसरीवाडय़ात होत होता, त्यामुळे या सोहळ्याला आगळे महत्त्व प्राप्त झाले होते. सारे वातारवण या वेळी भारावलेले होते. कॅपिटॉल खटल्यातील हरिभाऊ लिमये स्वत: या कार्यक्रमात उपस्थित होते.
लोकमान्य टिळक स्मृती अभियानतर्फे आयोजित या कार्यक्रमात महापौर चंचला कोद्रे, खासदार अनिल शिरोळे, ‘केसरी’चे संपादक डॉ. दीपक टिळक, संस्थेचे सचिव शैलेश टिळक, हिमानी सावरकर, बेळगाव ‘तरुण भारत’चे संपादक किरण ठाकूर, नगरसेविका मुक्ता टिळक, रोहित टिळक यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. क्रांतिकारकांच्या स्मृती जपणारे आणि त्यांच्या कार्याची ओळख करून देणारे संग्रहालय पुण्यात उभारण्यात येणार असल्याची घोषणा डॉ. टिळक यांनी या वेळी केली.
मुख्य सन्मान सोहळा आज
क्रांतिकारकांच्या परिवारांचा मुख्य सन्मान सोहळा रविवारी (१५ जून) सायंकाळी साडेपाच वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे होत आहे. याच कार्यक्रमात लोकमान्य हे चित्रमय चरित्रही प्रकाशित केले जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2014 2:55 am

Web Title: vande mataram kesari wada lokmanya tilak honour
टॅग Honour,Vande Mataram
Next Stories
1 वाहतूक नियमन करणारे वॉर्डन्स तीन महिन्यांपासून पगाराविना!
2 पुणे.. नोक ऱ्यांसाठी नाही उणे!
3 दृष्टिहीन विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी मिळू लागले ‘रायटर’
Just Now!
X