चित्रपटाशी संबंधित हयात असलेल्या एकमेव कलाकार; ‘सेटवर सारे हट्ट पुरवले गेले’

‘‘वंदे मातरम्’ चित्रपटाचे चित्रीकरण १९४७ मध्ये कोल्हापुरातील शालिनी स्टुडिओमध्ये झाले होते. त्या वेळी मी अवघी चार वर्षांची होते आणि चित्रपटात सुनीताबाई यांच्या भाचीची भूमिका मी करत होते. चित्रपटाच्या सेटवर मी सर्वात लहान होते, त्यामुळे माझे भरपूर लाड होत असत. माझा प्रत्येक बालहट्ट आवर्जून पुरवला जाईल याची काळजी सेटवरचा प्रत्येक जण घेत असे,!’ अशा शब्दांत ‘वंदे मातरम्’ या मराठी चित्रपटात बालकलाकार म्हणून ‘कोयना’ची भूमिका साकारलेल्या छाया हरोळीकर (पारसनीस) यांनी तब्बल बहात्तर वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला.

पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त ‘वंदे मातरम्’ या चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनाचे आयोजन प्रभात रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे शनिवारी (९ नोव्हेंबर) सायंकाळी पाच वाजता संग्रहालयाच्या प्रेक्षागृहात करण्यात आले आहे. राम गबाले यांनी दिग्दर्शित केलेला ‘वंदे मातरम्’ हा पहिला चित्रपट १९४८ मध्ये प्रदर्शित झाला होता. पुलं, ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके ही त्रयी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र आली होती. पुलं आणि सुनीताबाईंनी प्रमुख व्यक्तिरेखा साकारलेल्या या चित्रपटाचे कथानक भारतीय स्वातंत्र्य लढा आणि छोडो भारत चळवळीवर आधारित आहे.

या चित्रपटात सुनीताबाईंच्या भाचीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या छाया हरोळीकर (पारसनीस) या आता शहात्तर वर्षांच्या असून त्या पुण्यात स्थायिक झाल्या आहेत. चित्रपटाशी संबंधित हयात असलेल्या त्या एकमेव आहेत.

छाया हरोळीकर सांगतात,की चित्रीकरण झाले तेव्हा मी अवघी चार वर्षांची होते. त्यामुळे माझ्या आठवणी अत्यंत धूसर आहेत. त्या चित्रपटामुळे  पुलं, सुनीताबाई, राम गबाले असे दिग्गज मी जवळून पाहिले. लहान होते, त्यामुळे सगळे जण माझे ‘फोटो’ काढत असत. स्वातंत्र्य लढय़ाची गोष्ट सांगणारा हा एक उत्तम चित्रपट होता, मात्र गांधीजींच्या हत्येनंतर  विशेषत कोल्हापुरातील वातावरण दूषित झाल्याने हा   चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचला नाही.

‘वंदे मातरम्’ मधील जतन केलेला भाग पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.  विशेषत ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेले आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले या चित्रपटातील ‘वेदमंत्रांहून आम्हा वंद्य वंदे मातरम्’ हे अजरामर गीत माझ्या अत्यंत आवडीचे आहे. १९९१ मध्ये मॉरिशस येथे जागतिक मराठी संमेलनासाठी पुलं आणि सुनीताबाई आले होते. त्यादरम्यान चार वर्षे मी तेथे स्थायिक होते, त्यामुळे त्यांची भेट झाली. त्या दोघांशीही त्या वेळी मनमुराद गप्पा झाल्याची आठवण छाया हरोळीकर यांनी जागवली.