करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

पुणे : नाटय़ महोत्सवांपासून संगीत मैफिलीपर्यंत आणि व्याख्यानमालांपासून चित्रपट महोत्सवांपर्यंत सातत्याने होणारे सांस्कृतिक कार्यक्रम ही पुण्याची ओळख.. करोनाचा प्रादुर्भाव आता कमी होऊ लागल्याने सांस्कृतिक महोत्सव, कार्यक्रमांना पुन्हा सुरुवात झाली असून, सांस्कृतिक नगरी पूर्वपदावर येत असल्याचे चित्र आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे पुण्यातील सांस्कृतिक कार्यक्रम प्रतिबंधित झाले. टाळेबंदीच्या काळात नाटकांपासून चर्चासत्रांपर्यंत विविध कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. पुण्यात वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये पुरुषोत्तम करंडक स्पर्धा, पुलोत्सव, सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव, वसंतोत्सव, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ), फिरोदिया करंडक स्पर्धा, स्वरझंकार महोत्सव, गानसरस्वती महोत्सव, किलरेस्कर वसुंधरा महोत्सव, वसंत व्याख्यानमाला, अक्षरोत्सव अशा विविध कार्यक्रमांचा, महोत्सवांचा समावेश असतो. त्याशिवाय पुस्तक प्रकाशने, चर्चासत्र, व्याख्याने, पुरस्कार असे लहान-मोठे कार्यक्रमही नियमितपणे होत असतात. त्यामुळे पुण्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांचे वार्षिक वेळापत्रकच असते. त्यात मान्यवर कलावंत, साहित्यिकांचा सहभाग असतो. करोनाच्या प्रादुर्भावामुळे काही कार्यक्रम यंदा स्थगित करण्यात आले, काही पुढे ढकलण्यात आले. मात्र आता सांस्कृतिक कार्यक्रमांचे बिघडलेले वेळापत्रक टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर येऊ लागले आहे. गेल्या महिनाभरात काही महोत्सवांचे आयोजन झाले, तर पुढील काही कालावधीत आणखी काही महोत्सव होणार आहेत. गेल्या काही दिवसांत एकांकिका, नाटकांचा समावेश असलेला ‘नाटय़सत्ताक महोत्सव’, संवाद पुणे यांच्यातर्फे  ‘प्रबोधन पाक्षिक शताब्दी महोत्सव’, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे  ‘अभिवादन’ कार्यक्रम, तसेच ‘कानन दरस करो’ ही संगीत मैफील असे कार्यक्रम झाले. तर पुढील महिन्याभरातही काही महोत्सव, कार्यक्रम होणार आहेत. त्यात १२ ते १४ फेब्रुवारीदरम्यान खयाल यज्ञ, १९ ते २१ फे ब्रुवारी दरम्यान वसंतोत्सव, २७ आणि २८ फे ब्रुवारीला वारकरी संगीत संमेलन, ४ ते ११ मार्च दरम्यान १९ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असे काही कार्यक्रम होणार आहेत.

कलात्मक आणि सांस्कृ तिक भूक हा माणसाचा स्थायीभाव आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे नाईलाज म्हणून ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रम झाले. मात्र प्रत्यक्ष कार्यक्रमातून मिळणाऱ्या जिवंत अनुभवाला पर्याय नसतो. तो जिवंत अनुभव सर्वानाच हवा असतो. आता पुन्हा महोत्सव, कार्यक्रम सुरू होणे आनंददायी आहे. होऊ घातलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांतून, महोत्सवांतून नक्कीच चैतन्य येईल. आणखी काही काळ करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे लागेल. पण सांस्कृतिक चैतन्य निर्माण होणे शहरासाठी महत्त्वाचे आहे. 

– डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ दिग्दर्शक आणि पिफचे संचालक