उरुळी येथील हंजर आणि रोकेम या कंपन्यांच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पांना स्थायी समितीच्या सदस्यांनी सोमवारी भेट दिल्यानंतर अनेक त्रुटी व काही गैरप्रकार उजेडात आले. त्यानंतर प्रकल्पांच्या सद्य:स्थितीची सर्व माहिती स्थायी समितीला तातडीने सादर करावी, असा आदेश प्रशासनाला देण्यात आला.
शहरात जमा होणारा ओला तसेच सुका कचरा उरुळी येथे प्रक्रियेसाठी नेला जातो. कचरा प्रक्रियेसाठी महापालिकेने हंजर आणि रोकेम या दोन कंपन्यांबरोबर करार केले असून त्यांना कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प चालवण्याचे काम देण्यात आले आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे तसेच किशोर शिंदे, पृथ्वीराज सुतार, योगेश मुळीक, बाबुराव चांदेरे, चेतन तुपे, नीलम कुलकर्णी आदी स्थायी समिती सदस्यांची तसेच नगरसेवक बाळा शेडगे यांनी सोमवारी या प्रकल्पांना भेट दिली. प्रकल्पांना भेट दिल्यानंतर अनेक त्रुटी जागेवर पाहायला मिळाल्या, असे किशोर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
हंजर कंपनीतर्फे चालवल्या जाणाऱ्या प्रकल्पात रोज ७०० ते ९०० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते असे सांगण्यात येत असले, तरी तशी वस्तुस्थिती नसल्याचे जागेवर दिसून आले. मुख्य म्हणजे त्या संबंधीच्या सर्व नोंदी योग्यप्रकारे केल्या जात नसल्याचेही दिसले. अनेक नोंदी पेन्सिलने केल्याचे दिसले, तर काही ठिकाणी खाडाखोडही दिसली. आवश्यक कागदपत्र कोठेही दिसली नाहीत. तसेच प्रक्रिया न करताच या कंपनीतर्फे कचरा फार मोठय़ा प्रमाणावर साठवून ठेवला जात असल्याचेही जागेवर दिसले, अशी माहिती शिंदे यांनी दिली.
रोकेम कंपनीला कचऱ्यापासून वीज व गॅस तयार करण्याचे काम देण्यात आले असून त्याबाबतही अपुरी माहिती आम्हाला देण्यात आली. येथे तयार होणारी वीज अन्यत्र वापरासाठी दिली जाणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात प्रकल्प चालवण्याएवढीच वीज तयार होत असल्याचे दिसले, असे शिंदे यांनी सांगितले.