पंढरपूरपर्यंत पायी वारी करण्याची वर्षांनुवर्षे चालत आलेली परंपरा आणि वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी किवळ्यातील एका शेतकरी वारकऱ्याने आपल्यासोबत इतरांना मोफत पंढरीचे दर्शन घडवण्याचा उपक्रम सुरू केला. पाच वारकऱ्यांपासून सुरू झालेली ही दर्शनवारी यंदा हजाराच्या घरात गेली. वारकऱ्यांना विठोबाचे दर्शन घडवण्यात आपल्या स्वर्गीय समाधान मिळते, वारकऱ्यांमध्येच आपल्याला पांडुरंग दिसतो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
किवळ्यातील अशोक तरस (वय ४२) असे या वारक ऱ्याचे नाव आहे. पूर्वी ते रिक्षाचालक होते. त्यानंतर, त्यांनी वीटभट्टीचा व्यवसाय केला, पुढे ट्रक घेतला. वडिलांची पायी वारीची परंपरा, ती मुलाने कायम ठेवावी, अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार, सात वर्षांपूर्वी अशोक तरस यांनी वारीला सुरुवात केली. पहिल्या वर्षी ट्रकने स्वत:बरोबर अन्य वारकऱ्यांना स्व:खर्चाने वारी घडवली. दुसऱ्या वर्षी ही संख्या २५ झाली. पुढे, दोन स्वतंत्र बस करून १०० वारकरी नेले. यंदाच्या वर्षी १८ बसमार्फत एक हजार वारक ऱ्यांची मोफत व्यवस्था करण्यात आली. मावळ, देहूरोड, मुळशी आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वारकऱ्यांचा त्यामध्ये समावेश आहे. सामाजिक कार्यकर्त्यां सिंधूताई सपकाळ यांच्या हस्ते प्रवासाची सुरुवात करून देण्यात आली. या संदर्भात, तरस म्हणाले, पूर्वी परिस्थिती बेताचीच होती, आता सुधारली. दोन दिवसांच्या यात्रेद्वारे भाविकांना विठोबाचे दर्शन घडवू लागलो, तशी बरकत होऊ लागली. म्हणून पाच वारक ऱ्यांची संख्या हजारापर्यंत पोहोचली. वारकऱ्यात पांडुरंग दिसतो.