13 August 2020

News Flash

पालखीच्या विसावा ठिकाणी लावणार अजानवृक्षाची रोपे!

पालखी मार्गावर झाडे लावण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला असून यात पालखीच्या मुक्काम ठिकाणी अजानवृक्ष लावण्याचे ठरवले आहे.

| July 17, 2015 03:15 am

संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीवर असलेल्या आणि भाविकांसाठी विशेष महत्त्व असलेल्या अजानवृक्षाची रोपे आता पालखीच्या विसावा ठिकाणी लावली जाणार आहेत. तसेच पालखी मार्गावर असलेल्या शैक्षणिक संस्थांमध्येही ही रोपे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
‘इरेशिया लेविस’ असे या वृक्षाचे शास्त्रीय नाव असून तो देशी वृक्ष आहे. आळंदीत जसा संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधी ठिकाणी अजानवृक्ष आहे तसेच आळंदीहून थोडय़ा अंतरावर या वृक्षाचे ‘सिद्धबेट’ असून तिथे एका अजानवृक्षाच्या मुळातून फुटवे येऊन आणखी वृक्ष तयार झाले आहेत. या ठिकाणी ज्ञानेश्वरांना सिद्धी प्राप्त झाली अशी कथा सांगितली जाते.
‘माउली हरित अभियान’ आणि ‘बायोस्फीअर्स’ संस्थेमार्फत पालखी मार्गावर झाडे लावण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला असून यात पालखीच्या मुक्काम ठिकाणी अजानवृक्ष लावण्याचे ठरवले आहे. संजीवन समाधीवरील अजानवृक्षाच्या बिया गोळा करून तसेच सिद्धबेटातील अजानवृक्षाची कलमे तयार करून त्यापासून या वृक्षाची शंभर रोपे तयार करण्यात आली आहेत. हीच रोपे पालखीच्या विसावा ठिकाणी लावली जातील, अशी माहिती बायोस्फीअर्सचे डॉ. सचिन पुणेकर यांनी दिली.
पुणेकर म्हणाले, ‘अजानवृक्षावरील फुलांमधील मकरंद खाण्यासाठी कीटक येतात, तसेच फळे खाणारे पक्षीही या वृक्षावर बसतात. या वृक्षात अँटिऑक्सिडंट व अँटिकॅन्सरस गुणधर्मही असल्याचे मानले जाते. अनेक भाविक या वृक्षाखाली बसून ज्ञानेश्वरीचे पठण करतात. सामाजिक वनीकरण व वन विभागाने या अभियानाला मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागालाही या अभियानातील झाडे लावण्याबाबत पत्र दिले असून त्याला त्यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे.’ सिद्धबेटाला ‘देवराई’ म्हणजेच ‘पवित्र संरक्षित वना’चा दर्जा दिला जावा अशी मागणीही अभियानाचे माधव जगताप व पुणेकर यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2015 3:15 am

Web Title: varkari plantation alandi
Next Stories
1 स्मार्ट सिटीसाठी प्रवेशिका पाठवण्याचा प्रस्ताव मान्य
2 अधिकृत ‘स्कूल व्हॅन’मध्ये विद्यार्थिसंख्या मात्र अनधिकृत!
3 कविता, चित्रप्रदर्शन, नृत्यातून उलगडणार ‘महाकवी कालिदास’
Just Now!
X