राजकारणासह अन्य महत्त्वपूर्ण क्षेत्रात महिला उच्च पदावर पोहोचल्या आहेत. मात्र, अजूनही समाजाची महिलांच्या प्रती असलेली मानसिकता बदललेली नाही. कारण आजही सर्रास महिला हुंडाबळी, अंधश्रध्देच्या बळी ठरत आहेत, अशी खंत अ‍ॅड. वर्षां देशपांडे यांनी चिंचवडला बोलताना व्यक्त केली.
पिंपरी महापालिकेच्या नागरवस्ती विभागाच्या वतीने आयोजित ‘महिलांची सुरक्षितता’ या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. चिंचवडच्या रामकृष्ण मोरे नाटय़गृहात झालेल्या या कार्यक्रमास साधना जाधव, सुजाता पालांडे, सुभद्रा ठोंबरे, आरती चोंधे, सुरेखा गव्हाणे, अरूणा भालेकर, मंदा आल्हाट, वैशाली काळभोर, जयश्री गावडे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
अ‍ॅड. देशपांडे म्हणाल्या,की इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या, प्रतिभाताई राष्ट्रपती झाल्या. आता तर सर्वच क्षेत्रात महिलांनी आपले कार्यकर्तृत्व सिध्द करून समाजाला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आहे. विविध क्षेत्रात महिला आघाडी घेत असल्याचे चित्र एकीकडे असताना महिलांच्या बाबतीत समाजाची मानसिकता बदललेली दिसत नाही. दरवर्षी सहा लाख मुली गर्भातून गायब होत आहेत. त्यामुळे बेकायदेशीर गर्भनिदान करणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करायला हवी. महिलांनी शासनकर्ती व राज्यकर्ती जमात बनायला हवे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट व्हावे. प्रास्ताविक संभाजी ऐवले यांनी केले. सूत्रसंचालन किशोर केदारी यांनी केले.