अभिजात संगीतातील ज्येष्ठ गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १६ ते १८ जानेवारी या कालावधीत ‘वसंतोत्सव’ रंगणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानतर्फे यंदा प्रथमच वसंतोत्सव विमर्श हा संगीतशास्त्रविषयक चर्चासत्र हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या मैदानावर दररोज सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी (१६ जानेवारी) गॅ्रमी पुरस्कारविजेते पं. विश्वमोहन भट यांचे मोहनवीणावादन होणार असून त्यानंतर वसंतरावांचा नातू राहुल देशपांडे यांचे गायन होणार

दलेर मेहंदी
दलेर मेहंदी

आहे. त्रिलोक गुर्टू, रवी चारी, नितीन शंकर, संगीत हळदीपूर आणि राहुल देशपांडे यांच्या ‘फ्यूजन’ने दुसऱ्या दिवसाच्या (१७ जानेवारी) सत्राची सुरुवात होणार असून पाश्र्वगायक दलेर मेहंदी यांचे सुफी संगीत ऐकण्याची संधी लाभणार आहे. १८ जानेवारी रोजी पं. तेजेंद्र मुजुमदार (सरोद) आणि शशांक सुब्रमण्यम (बासरी) यांच्या जुगलबंदीने अखेरच्या सत्राचा प्रारंभ होणार असून ज्येष्ठ पाश्र्वगायक सुरेश वाडकर यांच्या गजलगायनाने वसंतोत्सवाची सांगता होणार आहे.
प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ गायक-गुरू पं. नाथराव नेरळकर आणि संगीताचे अभ्यासक डॉ. सुरेश चांदवणकर यांना वसंतराव देशपांडे स्मृती सन्मान प्रदान केला जाणार आहे. ५१ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या सन्मानाचे स्वरूप आहे. तर, सरोदवादक सारंग कुलकर्णी यांना वसंतराव देशपांडे उदयोन्मुख कलाकार पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून २५ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हिराबाग

तेजेंद्र मुजुमदार
तेजेंद्र मुजुमदार

चौकातील ज्योत्स्ना भोळे सभागृह येथे १५ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता होणाऱ्या वसंतोत्सव विमर्श उपक्रमात डॉ. दीपक राजा, समीर दुबळे आणि अनीश प्रधान सहभागी होणार आहेत.
 स्वरझंकार महोत्सव
व्हायोलिन अॅकॅडमीतर्फे ९ ते ११ जानेवारी या कालावधीत स्वरझंकार महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या मैदानावर दररोज सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी देवकी पंडित आणि आनंद भाटे हे शास्त्रीय आणि नाटय़संगीताचे सादरीकरण करणार आहेत. त्यानंतर पं. अतुलकुमार उपाध्ये (व्हायोलिन) आणि पं. रोणू मुजुमदार (बासरी) यांच्या वादनाची जुगलबंदी होणार आहे. राहुल शर्मा यांच्या संतूरवादनाने १० जानेवारीच्या सत्राचा प्रारंभ होणार असून उत्तरार्धात बनारस घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. राजन-साजन मिश्रा यांचे गायन होणार आहे. इटावा घराण्याचे उस्ताद शुजाद खाँ यांच्या सतारवादनाने ११ जानेवारी रोजी अखेरच्या सत्राची सुरुवात होणार असून उत्तरार्धात हरिहरन यांच्या गजलगायनाची मैफल होणार आहे.