News Flash

गोपूजनाने झगमगत्या दीपोत्सवाचा प्रारंभ

दिवाळीच्या पहिल्या दिवशी सामाजिक उपक्रमांची जोड देत वसुबारस सण उत्साहात साजरा करण्यात आला.

तिन्हीसांजेला घरोघरी लावण्यात आलेल्या पणत्या.. विद्युत रोषणाई आणि आकाशकंदिलाच्या प्रकाशाने उजळून निघालेला परिसर.. मंगलमय सणांची नांदी देणारे सनईचे सूर.. खास उभारलेल्या मंडपामध्ये सजविलेली गाय आणि वासरू.. पारंपरिक पेहरावातील सुवासिनींनी केलेले पूजन आणि औक्षण.. ‘दिन दिन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी’ असे म्हणत बाळगोपाळांनी फुलबाज्यांनी केलेली ओवाळणी.. अशा प्रसन्न वातावरणात सवत्सधेनूचे पूजन करून झगमगत्या दीपोत्सवास शनिवारी प्रारंभ झाला. दिवाळीच्या पहिल्या दिवशी सामाजिक उपक्रमांची जोड देत वसुबारस सण उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतीय संस्कृतीमध्ये असलेले गायीचे महत्त्व अधोरेखित करणारा वसुबारस हा दिवाळी सणाचा पहिला दिवस. यंदा एकादशी आणि गोवत्स द्वादशी या तिथी एकत्र आल्या होत्या. त्यामुळे तिन्हीसांजेला वसुबारस सण साजरा करण्यात आला. पूर्वी शहरामध्ये असलेले गोठे आता महापालिका हद्दीबाहेर गेले आहेत. मात्र, वसुबारस सणानिमित्त ठिकठिकाणी गाय आणि वासरू यांचे पूजन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. भांडारकर रस्त्यावरील साने डेअरी येथे आमदार मेधा कुलकर्णी आणि नगरसेविका माधुरी सहसस्रबुद्धे यांनी गोपूजन केले. पुणे महापालिका आणि अखिल भारतीय कृषी गो-सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका प्रांगणात गोपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महापौर दत्तात्रय धनकवडे आणि उपमहापौर आबा बागूल यांनी प्रारंभी गोपूजन केले. स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, प्रशासनातील अधिकारी अ‍ॅड. उल्का कळसकर, अ‍ॅड. मंजूषा इधाटे आणि नगरसेविकांनी या वेळी गोपूजन केले.
आदर्श मातांचा सन्मान
शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा विकलांग असलेल्या मुलांचे संगोपन करून त्यांना वाढविणाऱ्या अकरा आदर्श मातांचा वसुबारसनिमित्त निनाद पुणे संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या संचालिका आणि लेखिका मृणालिनी चितळे यांच्या हस्ते अलका चव्हाण, सीमा गिरे, सुजाता खेडेकर, सविता जाधव, नयना भालेराव, मंजू लंगडे, सरोज सिंग, लालबी शेख, कल्पना काकड, अनिता रोडे, प्रभा तुरे आणि मीना खेनट या मातांचा सत्कार करण्यात आला. माजी नगरसेविका शुभदा जोशी, स्मिता केसरी, वासंती कुलकर्णी, सुचेता फासे, सीमा दाबके यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. संस्थेतर्फे गेली १८ वर्षे हा उपक्रम राबविण्यात येत आहे, असे उदय जोशी यांनी सांगितले.
महिलांना बोनस वाटप
दी पूना र्मचट्स चेंबरतर्फे सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश राख आणि नीलिमा धायगुडे यांच्या हस्ते महिला कामगारांना बोनस वाटप करण्यात आले. चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले, उपाध्यक्ष जवाहरलाल बोथरा, सचिव अशोक लोढा, सहसचिव रायकुमार नहार, माजी अध्यक्ष वालचंद संचेती आणि स्त्री कामगार योजना अध्यक्ष देवेंद्र आगरवाल या वेळी उपस्थित होते.
‘कामायनी’मध्ये प्रदर्शन
कामायनी संस्थेतील मुलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर आणि पारपत्र कार्यालयाचे अधिकारी अतुल गोतसुर्वे यांच्या हस्ते झाले. मातीच्या आणि मेणाच्या सुबक पणत्या, मेणबत्त्या, शुभेच्छा पत्रे, आकाशकंदील, कागदी पिशव्या, कागदी फुलांचे हार, चहा मसाला, भाजणी, उटणे, मसाला सुपारी या वस्तूंचा समावेश असलेले हे प्रदर्शन रविवारी (८ नोव्हेंबर) सकाळी दहा ते रात्री आठ या वेळात खुले राहणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2015 3:32 am

Web Title: vasubaras festival celebrate
Next Stories
1 शहरात उद्यापासून रोज एक वेळ पाणीपुरवठा
2 एमपीएससीच्या परीक्षांचे वेळापत्रक पुढे सरकेना!
3 अनाथ मुलांनी लुटला मनमुराद खरेदीचा आनंद
Just Now!
X