‘लोकसत्ता’चे वरिष्ठ सहसंपादक अभिजित घोरपडे यांना ‘वसुंधरा इको जर्नालिस्ट’ सन्मान सोमवारी जाहीर झाला. पर्यावरण, पाणी, वातावरणातील बदल आणि निसर्गसंवर्धन आदी विषयांवरील सातत्यपूर्ण लेखन आणि पर्यावरण जागृतीसाठी पूरक काम केल्यामुळे घोरपडे यांचा हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पत्रकार परिषदेत सांगितले.
नववा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या १६ ते २३ जानेवारी दरम्यान पुण्यात होतो आहे. आठ दिवस चालणाऱया या महोत्सवाचा यंदाचा विषय ‘शून्य कचरा : सुरुवात स्वतःपासून’ हा असणार आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रपटांबरोबर अनेक बहुढंगी उपक्रमांनी रंगणारा भारतातील एकमेव महोत्सव आहे. पर्यावरण, वन्यजीवन, ऊर्जा, हवा आणि पाणी या संदर्भातील प्रश्नांचा उहापोह विविध उपक्रमांच्या माध्यमातून या महोत्सवातून घेण्यात येणार आहे.
महोत्सवात बीव्हीजी समूहाचे हनुमंत गायकवाड यांना वसुंधरा सन्मान, छायाचित्रकार ध्रतीमान मुखर्जी, द कॉर्बेट फाऊंडेशन संस्था आणि विद्या आत्रेय यांना वसुंधरामित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. डॉ. भारत भूषण यांना वसुंधरा ग्रीन टीचर आणि सुरेश खानापूरकर यांना जीवनगौरव सन्मान देऊन गौरविण्यात येईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत महोत्सवाच्या निमंत्रक आरती किर्लोस्कर, अध्यक्ष माधव चंद्रचूड आणि संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी दिली.