दीड महिन्यानंतर फळे, भाजीपाला विभागाचे कामकाज

पुणे : गेले दीड महिने बंद असलेला श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील फळ, भाजीपाला, कांदा-बटाटा विभाग येत्या रविवारपासून (३१ मे) सुरू होणार आहे. बाजार समिती, अडते संघटना, कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीत भाजीपाला बाजार पुन्हा सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख, श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते संघटनेचे अध्यक्ष विलास भुजबळ, हमाल पंचायत, कामगार संघटना तसेच टेम्पो संघटनेचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते.

मार्केटयार्डातील भाजीपाला बाजारात करोनाचा संसर्ग आढळून आल्यानंतर फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा विभाग १० एप्रिलपासून बंद ठेवण्यात आला होता. जिल्हा प्रशासन, बाजार समितीने बाजाराचे कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत येत्या रविवारपासून भाजीपाला बाजार पुन्हा सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले, अशी माहिती बाजार समितीचे सचिव बी. जे. देशमुख यांनी दिली.

दरम्यान, गूळ आणि भुसार बाजारात संसर्ग आढळून आल्यानंतर १९ मेपासून भुसार बाजार बंद ठेवण्यात आला होता.

भुसार बाजारातील व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या दी पूना र्मचट्स चेंबरच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर भुसार बाजाराचे कामकाज सोमवारपासून (२५ मे) सुरू करण्यात आले आहे. मार्केटयार्डातील मुख्य भाजीपाला बाजार गेले दीड महिने बंद होता. मात्र, शहरात भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून बाजार समितीचे मोशी, उत्तमनगर, मांजरी येथील उपबाजार पूर्णक्षमतेने कार्यान्वित ठेवण्यात आले होते. त्यामुळे शहरात भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला नाही.

भाजीपाला बाजारासाठी नियमावली

शनिवारी (३० मे) रात्री नऊनंतर भाजीपाल्याची आवक सुरू होईल. पहाटे चार वाजेपर्यंत भाजीपाला घेऊन येणाऱ्या गाडय़ांना बाजारआवारात प्रवेश दिला जाईल. शेतीमाल उतरविल्यानंतर त्वरित गाडीमालकाने वाहन घेऊन परत जाणे अपेक्षित आहे. बाजाराचे कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर भाजीपाला बाजार बंद करण्यात येईल. बाजार आवारातील पाकळीतील गाळेधारक आणि पाकळीच्या आतील बाजूस असलेले गाळेधारक दिवसाआड पद्धतीने गाळे सुरू ठेवतील. अडते, कामगारांना ओळखपत्र दाखवून प्रवेशद्वार क्रमांक १ आणि चार येथून प्रवेश देण्यात येईल. टेम्पोचालकांना प्रवेशद्वार क्रमांक चारने प्रवेश दिला जाईल. परवानाधारक गाळेधारकांना व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मुखपट्टी, सामाजिक अंतर  बंधनकारक

बाजारआवारातील सर्व व्यवहार सामाजिक अंतर ठेवून पार पाडावेत तसेच प्रत्येकाने मुखपट्टीचा वापर करावा, असे आवाहन प्रशासक बी. जे. देशमुख यांनी केले आहे. बाजारआवारात फक्त परवानाधारक ठोक खरेदीदारांना परवानगी देण्यात येणार आहे. परवाना नसल्यास परवानगी नाकारण्यात येईल. शेतीमाल प्लास्टिक जाळी (क्रेट) आणि गोण्यांमध्ये आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.