बटाटा, मिरची, आले, पावटा महाग

वाढत्या उन्हामुळे फळभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. गेल्या महिन्याभरापासून गुलटेकडीतील घाऊक फळभाजी बाजारात आवक कमी होत आहे. रविवारी बटाटा, आले, हिरवी मिरची, पावटा या फळभाज्यांच्या दरात १० ते २० टक्क्य़ांनी वाढ झाली. मागणी नसल्याने टोमॅटो, काकडी, फ्लॉवर या फळभाज्यांच्या दरात अल्पशी घट झाली आहे. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर आहेत.

गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात रविवारी राज्य तसेच परराज्यातून मिळून १५० ते १६० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक आणि गुजरात येथून मिळून ४ ते ५ ट्रक कोबी, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातून मिळून १५ ते १६ टेम्पो हिरवी मिरची, बंगळुरूतून १ टेम्पो आले, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूतून मिळून ३ ते ४ टेम्पो शेवगा, मध्यप्रदेश आणि गुजरात येथून मिळून लसूण पाच  ते साडेपाच हजार गोणी अशी आवक परराज्यातून झाल्याची माहिती घाऊक बाजारातील प्रमुख विक्रेते विलास भुजबळ यांनी दिली.

पुणे विभागातून सातारी आले १२०० ते १३०० पोती, टॉमेटो साडेपाच ते सहा हजार क्रेट्स (प्लास्टिक जाळी ), फ्लॉवर १४ ते १५ टेम्पो, कोबी १४ ते १५ टेम्पो, गवार ८ ते १० टेम्पो, भेंडी ७ ते ८ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, भुईमूग शेंग १५० ते १७५ पोती, शेवगा ३ ते ४ टेम्पो, गाजर २५० पोती, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, जुना कांदा १०० ट्रक, नवीन कांदा ४० ते ५० ट्रक ,आग्रा, इंदुर आणि तळेगाव येथून मिळून ५० ते ६० ट्रक अशी आवक झाली.

कोथिंबीर वगळता अन्य पालेभाज्या तेजीत

उन्हामुळे पालेभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. रविवारी मार्केटयार्डातील तरकारी विभागात कोथिबिंरीच्या दोन लाख जुडींची आवक झाली. मेथीची आवक कमी झाली असून बाजारात ३० हजार जुडींची आवक झाली. गेल्या आठवडयाच्या तुलनेत कोथिंबिरीची आवक वाढली असल्याने दर उतरले आहेत. मागणी वाढल्याने अन्य पालेभाज्यांचे दर तेजीत आहेत.

पालेभाज्यांचे दर (शेकडा जुडी)- कोथिंबीर- ३००- ८००, मेथी- ७००-१४००, शेपू- ८००- १२००, कांदापात- ८००-१२००, चाकवत- ५००- ७००, करडई- ४००- ५००, पुदिना- २००- २५०, अंबाडी- ५००- ६००, मुळा- ५००-१०००, राजगिरा- ४००-५००, चुका- ५००- ८००, चवळी- ४००-७००, पालक- ७००- १०००

नवरात्रोत्सवानंतर फळांच्या मागणीत घट

नवरात्रोत्सवानंतर फळांच्या मागणीत घट झाली आहे. सीताफळ, डाळिंबाचे दर उतरले आहेत. लिंबू आणि कलिंगडाची आवक घटल्याने दरात १० ते २० टक्क्य़ांनी घट झाली आहे. खरबूज, पपई, सफरचंद, अननस,  चिक्कू, पेरू, संत्री, मोसंबीचे दर स्थिर असल्याची माहिती फळबाजारातील व्यापाऱ्यांनी दिली. मार्केटयार्डातील फळबाजारात मोसंबी ८० टन, डाळिंब २०० ते २५० टन, अननस ५ ट्रक, लिंबे २ ते ३ हजार गोणी, चिक्कू ५०० गोणी, पेरू ६५० क्रेट्स (प्लास्टिक जाळी), कलिंगड १५ ते २० टेम्पो, खरबूज १० ते १५ टेम्पो, सफरचंद ७ ते ८ हजार पेटी, बोरे ४०० गोणी, सीताफळ १५ टन अशी आवक झाली.