News Flash

धान्य, फळभाज्या महागणार?

परतीच्या पावसाने राज्यातील तब्बल बारा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

परतीच्या पावसाने राज्यातील तब्बल बारा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

राज्यात सर्वदूर झालेल्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून पावसाबरोबरच हवामान बदलामुळे राज्यातील तब्बल बारा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. राज्याच्या कृषी विभागाने पीक परिस्थितीचा आढावा घेतला असून, याबाबतचा अहवाल तयार केला आहे. कृषी विभागाच्या पाहणीत प्रामुख्याने भात पिकावर पिवळा खोडा किडा आणि कापसावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव, तर तुरीचे नुकसान झाले आहे. या महत्त्वाच्या पिकांसोबत द्राक्ष, सीताफळ, डाळींब या फळांचे तसेच कांदा, बटाटा आणि महत्त्वाच्या फळभाज्यांचेही नुकसान झाल्यामुळे पुढील काळात तांदूळ, डाळ आणि महत्त्वाच्या फळभाज्यांच्या दरात वाढ होण्याची भीती निर्माण झाली आहे.

नुकसानीची अवस्था

राज्यातील खरिपाच्या पिकांमध्ये भात, बाजरी, ज्वारी, मूग, उडीद, कापूस यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ही पिके पक्वतेच्या अवस्थेत असून वेचणीला सुरुवात झाली आहे. मात्र, पावसामुळे भातशेती, कापूस आणि तुरीच्या पिकाचे नुकसान झाले आहे.

पुणे विभागामध्ये भात आणि बाजरी पिकांची काढणी सुरु झाली आहे. मका, सोयाबीन, भुईमूग, तूर ही पिके पक्वता ते काढणीच्या अवस्थेत आहेत. पुणे जिल्ह्य़ात भात पिकावर पिवळा खोडा किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. नगर जिल्ह्य़ात कापूस पिकावर पाने खाणारी अळी आणि शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. सोलापूरमध्ये तूर पिकावर हेलिकोव्हर्पा घाटे अळी आणि पिसारी पतंग कीड आढळली आहे.

कापसाला फटका

कापूस पिकाला प्रादुर्भाव झालेल्यांमध्ये औरंगाबाद येथील चौदा गावे, जालना जिल्ह्य़ातील ६९ गावे, तर बीडमध्ये १०४ गावे आहेत. या गावांमध्ये शेंदरी बोंडअळीमुळे कापसाचे नुकसान झाले आहे. याशिवाय परभणी आणि नांदेडमध्ये प्रत्येकी दहा गावे, हिंगोली अकरा गावे, अमरावती चाळीस गावे, बुलढाणा वीस, अकोला ३३, चंद्रपूर सात गावे आणि वाशिममध्ये अकरा गावांमधील कापसाच्या पिकाला प्रादुर्भाव झाला असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

भातपीकाला अडचण

नाशिक विभागात चाळीस तालुक्यांपैकी सोळा तालुक्यांमध्ये शंभर टक्क्य़ांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. नाशकात कापूस पिकावर तीन गावांमध्ये शेंदरी बोंड अळी आणि भात पिकावर पिवळा खोड किडा यांचा प्रादुर्भाव झाला आहे.

कोकणात भात आणि नाचणी ही पिके पक्वतेच्या अवस्थेत असून, भात पिकावर पालघर जिल्ह्य़ातील वाडा तालुक्यामधील दोन गावांमध्ये पिवळा खोड किडा या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ात राजापूर तालुक्यामधील काही ठिकाणी पिवळा खोडा किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे अहवालात नमूद केले आहे.

भात शेती पक्वतेच्या अवस्थेत असून, काही ठिकाणी हळव्या भात पिकाची कापणी सुरु झाली आहे. पक्वतेच्या अवस्थेतील बाजरी पिकाच्या काढणीची कामे सुरु आहेत. ज्वारी, तूर ही पिकेही पक्वता ते काढणीच्या अवस्थेत असून, मूग आणि उडिद पिकांच्या काढण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. कापूस पीक हे बोंडे लागणे ते बोंडे पक्वतेच्या अवस्थेत असून, वेचणीला सुरुवात झाली आहे.

परतीचा पाऊस अनेक ठिकाणी झाल्यामुळे पक्वतेच्या अवस्थेत असलेली पिके काळी पडणे, त्यांना कीड आणि बुरशी लागण्याचे प्रकार घडले आहेत. याबाबतचा अहवाल तयार करुन तो राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे.     – सचिंद्र सिंह, राज्य कृषी आयुक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2017 1:43 am

Web Title: vegetables price rise due to heavy rain
Next Stories
1 वर्तृळाकार रस्त्यासाठी कर्ज
2 …अन् पोलिसांनी पैंजणावरून खुनाचं रहस्य उलगडलं
3 दिवाळीभेट स्वीकारण्यास बंदी
Just Now!
X