25 September 2020

News Flash

खाऊखुशाल : सुवर्ण

नव्या पदार्थाच्या आणि नव्या ठिकाणांच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्ण व्हेज या हॉटेलची भेट आनंद देणारी ठरेल. कोल्हापुरी मिसळ आणि इतर अनेक नेहमीच्या पदार्थाबरोबरच इथे जम्बो कट

नव्या पदार्थाच्या आणि नव्या ठिकाणांच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्ण व्हेज या हॉटेलची भेट आनंद देणारी ठरेल. कोल्हापुरी मिसळ आणि इतर अनेक नेहमीच्या पदार्थाबरोबरच इथे जम्बो कट वडा, जम्बो बटाटा वडा, कढी वडा, शेव टोमॅटो भाजी.. मराठी थाळी, पंजाबी थाळी.. हे आणि असे अनेक पदार्थ दिले जातात. इथल्या वेगवेगळ्या पदार्थाची चव चाखल्यानंतर काही तरी वेगळं मिळाल्याचा अनुभव नक्कीच येतो.

मस्त, चमचमीत काही तरी खाण्याची इच्छा झाल्यानंतर एखादं चांगलं ठिकाण सापडावं असं सतत वाटत असतं. अशा एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर एकच काय अनेक चांगले चांगले पदार्थ मिळाले तर जो काही आनंद खवय्यांना होतो, तो काही वेगळाच असतो. नारायण पेठेत नव्यानं सुरू झालेल्या सुवर्ण व्हेजमध्ये गेल्यानंतर हा अनुभव नक्कीच येईल. कुणाल दवे आणि सुमीत जोशी यांनी मिळून हे हॉटेल नव्यानं सुरू केलं आहे. कोल्हापुरी टेस्टी मिसळीसह अनेक पदार्थ इथे मिळतात आणि ज्यांना जेवणासाठी इथे जायचं असेल त्यांच्यासाठीही अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. कुणाल दवे यांनाही हॉटेल व्यवसायात काही तरी चांगलं करण्याची इच्छा होती आणि त्यांना सुमीत यांची साथ मिळाली. सुमीत जोशी मूळचे सांगलीचे. हॉटेल व्यवस्थापनाचं शिक्षण त्यांनी सुरुवातीला गोव्यात घेतलं. नंतर याच शिक्षणासाठी ते मुंबईत तीन वर्ष होते आणि पुढे लंडनमध्ये जाऊनही त्यांनी या विषयाचं शिक्षण घेतलं. व्यवसायाच्या निमित्तानं पुण्यात आल्यानंतर अनुभवासाठी त्यांनी आधी वडगावला एक स्नॅक्स सेंटर सुरू केलं. त्या अनुभवातून भोसरी एमआयडीसीमध्ये मोठं हॉटेल सुरू केलं आणि आता त्याच अनुभवाच्या आधारे त्यांनी आणि दवे यांनी नारायण पेठेत सुवर्ण व्हेज हे हॉटेल सुरू केलं आहे. या जागेत दवे यांचे आधी ‘खरोखर कोल्हापुरी मिसळ’ हे हॉटेल सुरू केलं होतं आणि ती मिसळ चांगलीच प्रसिद्ध झाली होती. तेथे आता या दोघांनी मिळून नवीन हॉटेल सुरू केलं आहे.

चवीला तिखट आणि तरीही जळजळीत नसलेली कोल्हापुरी मिसळ ही या हॉटेलची खासियत. या मिसळीचं वेगळेपण हे की मिसळीबरोबर सँपल दिलं जात नाही तर कट दिला जातो. मिसळीत फरसाण, मटकीची उसळ आणि उकडलेला बटाटा हे तीन मुख्य घटक पदार्थ आणि त्याच्यावर कट ओतून मिसळ तयार होते. तेलाचा तवंग असलेला हा कट चांगलाच तिखट असणार असं वाटतं. मात्र या कटचं वैशिष्टय़ं असं की कट तयार करण्यासाठी वापरले जाणारे मसाले ही या हॉटेलचीच रेसिपी असल्यामुळे या कटचा त्रास होत नाही. हा कट मिसळीवरही ओतला जातो आणि त्याची एक वाटीही मिसळीबरोबर मिळते. मिसळीइतकीच इथली चांगली मागणी असलेली वेगळी डिश म्हणजे जम्बो बटाटावडा. नेहमीच्या बटाटावडय़ाच्या आकारापेक्षा दुप्पट आकाराचा हा वडा नुसता चटणी-मिरची बरोबर खा किंवा जम्बो कट वडा अशीही डिश ट्राय करून बघा. कट आणि वडा यालाही एक चांगला पर्याय इथे आहे. तो म्हणजे जम्बो कढी वडा. वडा मिसळ अशीही एक डिश इथे घेता येते.

ज्यांना दुपारी किंवा रात्री पूर्ण ताट भरून जेवायचं आहे त्यांच्यासाठी मराठी आणि पंजाबी अशा दोन प्रकारच्या थाळी इथे मिळतात. सुकी भाजी, रस्सा भाजी, पोळ्या, दाल, राइस, पापड, रायतं अशी पहिल्या प्रकारातील थाळी असते. पंजाबी अमर्यादित थाळीत सूप, मसाला पापड, पनीरची आणि आणखी एक अशा दोन भाज्या, गव्हाचे दोन पराठे, रायतं, सॅलड, जीरा राइस किंवा पुलाव आणि एक गोड पदार्थ असे पदार्थ असतात. ज्यांना पूर्ण जेवण नको असेल त्यांच्यासाठी पुरी भाजी, छोले भटुरे, पाव भाजी असेही पर्याय आहेत. शिवाय आणखी पंजाबी कॉम्बो एक वेगळा पर्याय इथे देण्यात आला आहे. मिक्स व्हेज, अलू मटार, शेव टोमॅटो, अलू गोबी, मिक्स व्हेज अशा वेगवेगळ्या पंजाबी भाज्यांपैकी एक भाजी आणि दोन पराठे, रायतं असे पदार्थ या कॉम्बो पॅकमध्ये येतात. हा पर्यायही अनेकांना आवडल्याचा अनुभव आहे.

भाताचे अनेक प्रकार इथे मिळतातच आणि वरणभात अशीही डिश मिळते. तुरीच्या डाळीचं ज्याला गोडं वरण म्हटलं जातं असं साधं वरण आणि भात असा हा मेन्यू आहे. शिवाय इथला मसाला राइस हाही एक चांगला आणि वेगळा प्रकार. दोन-तीन प्रकारच्या पंजाबी मसाल्यांमध्ये पांढरा भात फ्राय करून हा मसाला राइस बनतो. पंजाबी मसाल्यांमुळे त्याची चवही मस्त लागते. वेगवेगळ्या चवींचे पराठे, वेगवेगळ्या स्वादाच्या पंजाबी भाज्या, भाताचे प्रकार, सँडविचचे प्रकार असंही इथलं मेन्यू कार्ड भरगच्च आहे. मात्र चवीनं खाणाऱ्यांसाठी त्यातही वेगळं काही ना काही आहेच.

  • कुठे आहे? : ३४६ नारायण पेठ, महापालिका वाहनतळाच्या इमारतीजवळ
  • दूरभाष : ६५००१९९१
  • केव्हा ? : सकाळी नऊ ते रात्री अकरा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2017 4:23 am

Web Title: vegetarian food at pune
Next Stories
1 ‘आधार’ची माहिती साठविणाऱ्या कंपनीचे नाव गोपनीय
2 ऐन गणेशोत्सवामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांना कात्री
3 कर्वेनगर भागात घरफोडी करणारे चोरटे अटकेत; अकरा गुन्हे उघड
Just Now!
X