तारा रेसिडेन्सी ते गिरीजाशंकर विहार दरम्यानच्या वाहतूक कोंडीवर उपाय

कर्वेनगर-वारजे क्षेत्रीय कार्यालयाजवळ असलेला अरुंद पूल तीन आणि चारचाकी वाहनांसाठी बुधवारपासून (१० ऑक्टोबर) बंद होणार आहे. या अरुंद पुलामुळे सातत्याने होणारी वाहतुकीची कोंडी आणि छोटय़ा-मोठय़ा अपघातांच्या पाश्र्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

तारा रेसिडेन्सी आणि गिरिजाशंकर विहार सोसायटीच्या मधील नाल्यावर स्लॅब टाकून काही वर्षांपूर्वी हा पूल बांधण्यात आला होता. सिंहगड रस्त्यालगतच्या राजाराम पुलावरून कर्वेनगर-कोथरूड परिसरात जाण्यासाठी या पुलाचा मोठय़ा प्रमाणात वापर होत होता. पूल अरुंद असल्यामुळे तेथे वाहतुकीची सातत्याने कोंडी होत होती. लहान-मोठे अपघातही येथे घडले होते. त्यामुळे हा रस्ता बंद करावा, अशी मागणी सातत्याने नागरिकांकडून होत होती. नागरिकांनी मागणी केल्यानंतर स्थानिक नगरसेविका मंजूश्री खर्डेकर, जयंत भावे आणि दीपक पोटे यांनी हा पूल बंद करण्यासाठी पाठपुरावा केला. वाहतूक पोलिसांनीही या भागाची पाहणी करून त्याबाबतचा आदेश काढला. या आदेशाची बुधवारपासून अंमलबजावणी होणार असल्याची माहिती भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी दिली.

या पुलाच्या दोन्ही बाजूला जनजागृतीसाठी फलक लावण्यात आले होते. येत्या एक-दोन दिवसांमध्ये स्टीलचे खांब (बोलार्ड) बसवून तीनचाकी आणि चारचाकी वाहनांची वाहतूक बंद करण्यात येईल. या रस्त्याला अन्य पर्यायी रस्ते असून त्यांचा वापर वाहनचालकांनी करावा, असे आवाहन नगरसेवक जयंत भावे आणि मंजूश्री खर्डेकर यांनी केले आहे.

हा रस्ता पूर्व-पश्चिम असा असून दुहेरी वाहतुकीचा आहे. रस्त्यावर चारचाकी वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होत होती. त्यामुळे गिरिजाशंकर विहार सोसायटीच्या क्रमांक सहाच्या दारापुढील बाजूस आणि पश्चिम बाजूस असलेल्या हॉटेल कोकणरत्नच्या दिशेने स्टीलचे खांब (बोलार्ड) बसविण्यास वाहतूक शाखेकडून मान्यता देण्यात येत आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त अशोक मोराळे यांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.