शहरात झपाटय़ाने वाढत जाणारी खासगी वाहनांची संख्या व त्यातून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाढत गेलेली प्रदूषणाची पातळी.. शहराला एका मोठय़ा धोक्याच्या वळणावर घेऊन जाण्याचे पाप शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीमधील ‘खाऊगल्ली’ व तेथे वर्षांनुवर्षे चरून गेलेल्या लाभार्थीचेच असल्याचे एक उघड सत्य आहे. वाहन उद्योग, इंधन विक्रेते, वाहनांची दालने, देखभाल व दुरुस्ती केंद्रे आदी अनेकांचे हितसंबंध जपताना शहराची सार्वजनिक वाहतूक जाणीवपूर्वक कमजोर ठेवण्याचे प्रयत्न झाले. आता हे सारे शहराच्या मुळावर आले असून, परिस्थिती हाताबाहेर जाऊ  द्यायची नसेल, तर ही ‘खाऊगल्ली’ बंद करून पीएमपी योग्य मार्गावर आणण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
दिल्लीत वाढत्या वाहनांमुळे निर्माण झालेली गंभीर स्थिती हाताळणे कठीण झाले आहे. पुण्यातही मागील काही वर्षांमध्ये खासगी वाहनांची संख्या झपाटय़ाने वाढली व त्यातून वाहतुकीसह माणसाच्या आरोग्यास हानी पोहोचविणारे प्रदूषणाचे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. संबंधित वृत्तमालिकेच्या दोन भागामध्ये या गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला. मात्र, मुळात ही परिस्थिती निर्माण होण्यामागे असलेले महत्त्वाचे कारण शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कमजोर ठेवण्यामध्ये आहे. बस आहेत, पण पुरेशा प्रमाणात त्या रस्त्यावर नाहीत. मुख्य म्हणजे हव्या त्या वेळेला हव्या त्या ठिकाणी बस दिल्या जात नाहीत. त्यामुळे एकीकडे मोकळ्या, तर दुसरीकडे प्रवाशांनी खच्चून भरलेल्या बस दिसतात. या साऱ्या प्रकारातून शहरांतर्गत वाहतुकीसाठी स्वत:चे वाहन घेण्याकडेच अनेकांचा कल असतो. त्यामुळे ज्याला वाहन चालविता येत नाही व घेणे परवडत नाही, अशीच व्यक्ती नाईलाजास्तव बसचा वापर करताना दिसत आहे. ज्या काळात जाणीवपूर्वक पीएमपी खड्डय़ात घालण्याचा प्रयत्न झाला, त्याच काळात शहरात खासगी वाहनांची संख्या वाढत गेली.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील अभ्यासक व सजग नागरिक मंचचे जुगल राठी हे अनेक वर्षांपासून पीएमपीच्या प्रश्नात लक्ष घालून तिच्या सुधारणेचा पाठपुरावा करीत आहेत. याबाबत ते म्हणाले की, शहराचा र्सवकष वाहतूक आराखडा झाला तेव्हा शहरांतर्गत ६० टक्के प्रवास हा सार्वजनिक बसमधून झाला पाहिजे, हे सूत्र मान्य करण्यात आले होते. पीएमपीने खर्च वाढवला, तिकिटाचे दर वाढविले, बसही वाढविल्या, मात्र प्रवासी वाढू दिले नाहीत. प्रवाशांच्या गरजेनुसार कधीच नियोजन होऊ दिले नाही. २००७ अखेर पीएमटी व पीसीएमटीचे एकत्रीकरण करून पुणे परिवहन महानगर (पीएमपी) ही कंपनी स्थापन करण्यात आली. सुरुवात योग्य झाली, पण नंतर पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण झाली.
सध्या ठेकेदारांच्या बसची संख्या वाढत आहे. ठेकेदाराला सोयीचे धोरण राबविले जात आहे. पीएमपीची भाडेवाढ मागताना ठेकेदाराचा तोटा भरून काढण्याचे कारण दिले गेले. पण, दुसरीकडे पाहिल्यास ठेकेदाराकडील बस परवडतात म्हणून ठेकेदारांच्या बसचा भरणा वाढवला जात आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी व ठेकेदार हे त्यासाठी हातात हात घालून काम करीत आहेत. ठेकेदारांमुळे रोजचे २५ लाख रुपये उत्पन्न कमी झाले आहे, मात्र ही स्थिती त्यांना वेगवेगळ्या हितसंबंधातून जाणीवपूर्वक ठेवायची आहे. पीएमपीसाठी एक व्यावसायीक योजना तयार होऊन त्यासाठी स्वायत्त तज्ज्ञ असावा व त्यातून ती फायद्यात आणावी, यासाठीच कंपनीची स्थापना झाली. आहे त्या बस संख्येत प्रवाशांना उत्तम सेवा देता येऊ शकते. मात्र, पीएमपीला फायद्यात आणायचेच नसल्याचा चंग बांधण्यात आला असल्याचा आरोपही राठी यांनी केला.

 बस वाढल्या, पण प्रवासी कमी झाले

पीएमपीच्या बसची संख्या २००८ मध्ये चौदाशे होती. त्यावेळी दैनंदिन ११ लाख प्रवासी बसने प्रवास करीत होते. त्यावेळी ठेकेदारांच्या बस सुमारे साडेतीनशे होत्या. त्यानंतर टप्प्याटप्प्याने बसची खरेदी झाली. त्यातून खर्च वाढला गेला. बसच्या तिकिटांचे दरही वाढविले गेले. पण प्रवाशांच्या गरजेनुसार सेवा नसल्याने प्रवासी संख्या सातत्याने घटून प्रवासी स्वत:च्या खासगी वाहनांकडे वळले. आता बसची संख्या दीडपटीने वाढली आहे. ती एकविसशे झाली असली, तरी प्रवासी घटून दैनंदिन केवळ सव्वा दहा लाख राहिले आहेत. ही जादूही पीएमपीच्या ‘खाऊगल्ली’चीच आहे.

श्रीकर परदेशींचा चाबूक हवाच

पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर श्रीकर परदेशी यांनी केवळ तीनच महिन्यात पीएमपीची गाडी बऱ्याच प्रमाणात रुळावर आणली होती. राखी पौर्णिमेला पीएमपी ९५ टक्के बस रस्त्यावर आणून योग्य ठिकाणी वापरते. त्यातून दैनंदिन प्रवासी संख्येत पाच ते सहा लाखांची वाढ होते. हे रोजच का घडू शकत नाही, याचे उत्तर शोधताना परदेशी यांनी अवघ्या काही दिवसांतच बदल घडवून आणले. बसची देखभाल व सुटय़ा भागांसाठी रोजच्या उत्पन्नातून काही निधी बाजूला ठेवण्यात आला. कार्यक्षमता न दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांचे वेतन रोखले. त्यातून एकच जादू झाली अन् आजारी पीएमपी तीनच महिन्यात ठणठणीत बरी झाली. परदेशींचा तो चाबूक पुन्हा वापरण्याची गरज निर्माण झाली आहे.