स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत रस्त्याच्या कडेला बेवारस उभ्या असलेल्या, वाहतुकीला अडथळा ठरत असलेल्या वाहनांवर कारवाई करताना महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून वाहनांवर ‘सरसकट’ कारवाई करण्यात आली. त्यामुळे बेवारस वाहनांबरोबरच चालू स्थितीतील आणि वापरातील गाडय़ाही जप्त झाल्या. अशा कारवाईमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत रस्त्याच्या कडेला महिनोनमहिने उभी असलेली वाहने उचलण्याची मोहीम महापालिकने जाहीर केली होती. वाहतूक पोलिसांच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात येईल, रस्त्याच्या कडेला वाहने लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे महापालिकेडून सांगण्यात आले होते. त्यानुसार या कारवाईला प्रारंभ झाला. मात्र बेवारस वाहनांबरोबरच चालू स्थितीतील आणि नियमित वापरात असलेली दुचाकी, चारचाकी वाहनेही जप्त करून ती नदीपात्रात ठेवण्यात आली. जप्त केलेली वाहने बेवारस नसल्याचा दावा करून वाहनमालकांनी महापालिका प्रशासनाकडे त्याबाबत तक्रारी केल्या. मात्र दंडाची रक्कम भरल्यानंतरच गाडय़ा ताब्यात दिल्या जातील, अशी भूमिका महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतल्यामुळे वाहतूक पोलीस, महापालिका अधिकारी आणि नागरिक यांच्यात वादावादीचे प्रसंग उद्भवले. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही नागरिकांनी तक्रारी केल्या. मात्र आयुक्त अनुपस्थित असल्यामुळे अद्यापही त्यावर निर्णय झालेला नाही.

उच्च न्यायालयाचे आदेश आणि स्वच्छ सर्वेक्षणाच्या पाश्र्वभूमीवर बेवारस आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या चार दिवसांत ११५ वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. विश्रामबागवाडा, खडक, कोथरूड, शिवाजीनगर, दत्तवाडी, वारजे या भागात ही कारवाई करण्यात आली आहे. मध्यरात्री पोलिसांकडून वापरातील गाडय़ा उचलण्यात आल्या असून त्यामध्ये गाडय़ांचे नुकसान झाल्याच्या तक्रारीही नागरिकांनी केल्या आहेत.

रस्त्याच्या कडेला वाहने लावू नका

रस्त्याच्या कडेला दुचाकीसाठी पाच हजार रुपये, तीन आसनी रिक्षा, सहा आसनी रिक्षा यांना प्रत्येकी दहा हजार रुपये आणि चारचाकी वाहनांसाठी पंधरा हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांनी रस्त्याच्या कडेला वाहने लावू नयेत, असे आवाहन करतानाच पीएमपीकडून रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने गाडी लावल्या गेल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी दिला आहे.