पिंपरी-चिंचवड शहरातील वाहन चोरीचे वाढते प्रकार रोखण्यासाठी पोलीस आयुक्त आर. के.पद्मनाभन यांनी वाहन चोरी विरोधी पथक तयार केले आहे. या पथकाने एका महिन्यात वाहन चोरीचे २५ गुन्हे उघडकीस आणले. या पथकाकडून चार वाहन चोरटय़ांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून वाहन चोरीचे १८ आणि एटीएम यंत्र फोडण्याचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
प्रवीण गोरक्षनाथ गाडे (वय २६), नितीन मच्छिंद्र नेहे (वय २३), निखिल गाडे (वय २४) आणि हरीष गाडे (वय २७, सर्वजण रा. सावरगावतळे, ता. संगमनेर जि अहमदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त आर.आर.पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन चोरी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे आणि उपनिरीक्षक गिरीष चामले यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथक म्हाळुंगे परिसरात गस्त घालत असताना एका खासगी कंपनीसमोर आरोपी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी वाहन चोरी केल्याचे कबूल केले. त्यांनी संगमनेर, आळेफाटा, मंचर, सिन्नर, खेड, चिखली, पिंपरी , चिंचवड, निगडी आणि हिंजवडी परिसरातून वाहने चोरल्याचे सांगितले. आरोपींकडून वेगवेगळ्या कंपन्यांच्या १८ दुचाकी आणि एक टेम्पो हस्तगत करण्यात आला. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव करत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 21, 2019 2:11 am