18 January 2019

News Flash

वाहनचोरीचा वेग कायम

गुन्हे वाढल्याची पोलीस आयुक्तांची कबुली

दिवसाला आठ वाहनांची चोरी; गुन्हे वाढल्याची पोलीस आयुक्तांची कबुली

शहरातून दररोज आठ ते नऊ दुचाकी वाहने चोरीला जात आहेत. गेल्या वर्षी पुणे शहर परिसरातून ३ हजार १९६ वाहनेचोरीला गेली. वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण ३० टक्के एवढे आहे. वाहनचोरीचे वाढते गुन्हे पाहता अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण कमी आहे, अशी कबुली पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या वर्षी पुणे शहरात दाखल झालेल्या गुन्ह्य़ांची आकडेवारी, दाखल गुन्हे, गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण याबाबतची माहिती पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी शुक्रवारी दिली. पोलीस आयुक्तांनी वाहनचोरीच्या गुन्ह्य़ांमध्ये गेल्या वर्षी तीन टक्क्य़ांनी वाढ झाल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, लूटमार, साखळीचोरी, घरफोडी, चोरी या प्रकारच्या गुन्ह्य़ांमध्ये गेल्या वर्षी घट झाली आहे. लूटमारीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण ८५ टक्के, घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण ५४ टक्के, चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण ३२ टक्के, वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण ३० टक्के एवढे आहे. साखळीचोरी, घरफोडी, चोरी, मालमत्ताविषयक गुन्ह्य़ांमध्ये गेल्या वर्षी घट झाली आहे. हे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण चांगले आहे. मात्र, वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण कमी आहे.

मारहाण, खून, खुनाचा प्रयत्न अशा प्रकारच्या गुन्ह्य़ांमध्ये घट झाली आहे. पुणे पोलिसांकडून गेल्या वर्षी गंभीर स्वरुपाचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले. सिंहगड रस्ता भागातील बालिकेचा खून, कोथरूड भागातील व्यावसायिकाचे अपहरण, निगडीतून बालकाचे अपहरण या गंभीर गुन्ह्य़ांचा पोलिसांकडून छडा लावण्यात आला होता. या गुन्ह्य़ांचा तपास करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कामगिरी कौतुकास्पद आहे. यंदाच्या वर्षी शाळा तसेच महाविद्यालयांच्या आवारात होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस काका हा उपक्रम राबविण्यात आला. संगणक अभियंता रसिला राजू हिच्या खुनानंतर नोकरदार महिलांसाठी बडी कॉप हा उपक्रम सुरु करण्यात आला.

जाळपोळ आणि तोडफोडीचे गुन्हे

किरकोळ कारणावरुन सामान्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात येते. गेल्या वर्षी (२०१७) वाहने जाळपोळीच्या ४७ घटना घडल्या. या गुन्ह्य़ांमध्ये ६५ आरोपींना अटक करण्यात आली. २०१६ मध्ये वाहनजाळपोळीचे ६३ गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यावेळी याप्रकरणात ८० आरोपींना अटक करण्यात आली होती. गेल्या वर्षी वाहनांची तोडफोड करण्याचे १५ गुन्हे दाखल करण्यात आले असून याप्रकरणात ५८ जणांना अटक करण्यात आली. २०१६ मध्ये वाहन तोडफोडीचे १६ गुन्हे दाखल झाले होते. याप्रकरणात ८७ आरोपींना गजाआड करण्यात आले होते. गेल्या वर्षीची वाहन जाळपोळ आणि तोडफोडीच्या गुन्ह्य़ांच्या आकडेवारीची तुलना करता २०१६ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्य़ांपेक्षा कमी आहे.

विनयभंगाचे गुन्हे वाढले

गेल्या वर्षी बलात्काराचे ३४९ गुन्हे दाखल झाले. बलात्कारांच्या गुन्ह्य़ांची आकडेवारी पाहता विनयभंगाच्या गुन्ह्य़ांमध्ये वाढ झाली आहे. बलात्कार आणि विनयभंगाचे जवळपास सर्व गुन्हे पोलिसांकडून उघडकीस आणण्यात आले आहेत. गेल्या वर्षी शहरात बलात्काराचे ३४९ गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ३४५ गुन्हे उघडकीस आणण्यात आले. विनयभंगाचे ६९९ गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ६९४ गुन्ह्य़ांचा तपास करुन आरोपींना अटक केली.

First Published on January 13, 2018 3:13 am

Web Title: vehicle theft in pune 2