पिंपरी-चिंचवड शहरात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. नववर्षाचं सेलिब्रेशन करताना मद्यपान केलेल्या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. यातूनच दोन गटातील आरोपींनी कोयत्याने सहा वाहनांची तोडफोड केली. रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास मोहन नगर चिंचवड येथे ही घटना घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलासह १३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन नगर चिंचवड या ठिकाणी नववर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी काही तरुण एकत्र आले होते. त्यांनी मद्यपान केलं. परंतु, किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाले. यातूनच रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या सहा चारचाकी आणि रिक्षांचा काचा कोयत्याने फोडून हुल्लडबाजी केली.

आणखी वाचा- “…मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय,” नियंत्रण कक्षात फोन करणाऱ्या पुणेकरांना आश्चर्याचा धक्का

ही घटना रात्री साडेबाराच्या सुमारास मोहन नगर चिंचवड येथे घडली. दरम्यान, या प्रकरणामुळे पिंपरी पोलिसांची दमछाक झाल्याचं पाहायला मिळत आहे. रात्रभर आरोपींचा शोध घेऊन तोडफोड प्रकरणी एकूण १३ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. वर्षाची सुरुवातच तोडफोडीच्या सत्राने झाल्याने नागरिकांमध्ये मात्र पोलिसांविषयी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.