ग्राहकांच्या सुरक्षेची काळजी घेऊन तब्बल साडेचार महिन्यांनी शहरातील मॉल बुधवारपासून सुरू झाले असले तरी पहिल्या दिवशी खरेदीसाठी अत्यल्प गर्दी असल्याचे जाणवले. दिवसभर लागून राहिलेला रिमझिम पाऊस आणि राममंदिर पायाभरणीचा आनंदोत्सव यामुळे मॉलमधील खरेदीवर परिणाम झाला.

करोनाचा प्रभाव रोखण्यासाठी योग्य ती दक्षता घेऊन शहरातील मॉल सुरू करण्यास महापालिकेने परवानगी दिली असली तरी खरेदीसाठी नागरिक उत्सुक नसल्याचे चित्र पहिल्या दिवशी दिसले. खरेदीसाठी वैविध्यपूर्ण पर्याय, तत्पर सेवा आणि वातानुकूलन यंत्रणा यामुळे मॉलमध्ये जाऊन खरेदी करण्याला पुणेकर प्राधान्य देत होते. त्यातूनच तरुणाईसह विविध वयोगटातील नागरिकांमध्ये मॉल संस्कृती विकसित झाली. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमध्ये गर्दी टाळण्याच्या उद्देशातून मॉल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. आता ग्राहकांच्या सुरक्षेची दक्षता घेऊन मॉल सुरू करण्यास परवानगी मिळाली असली तरी ग्राहकांनी मॉलकडे पाठ फिरविली आहे, असे चित्र पहिल्या दिवशी जाणवले.

मॉलमध्ये गर्दी न झाल्यामुळे लोकांमध्ये अजूनही करोनाची धास्ती आहे, असे म्हणता येऊ शकेल. एरवी सेंट्रल मॉलमध्ये दररोज किमान एक हजार ग्राहक भेट देत असत. मॉल सुरू झाल्यानंतर बुधवारी ही संख्या दीडशे-दोनशे ग्राहकांपर्यंत मर्यादित राहिली, अशी माहिती सेंट्रल मॉलचे स्टोअर व्यवस्थापक प्रीतम पापानी यांनी दिली. मॉलमध्ये येण्यास उत्सुक नसलेल्या ग्राहकांना ‘होम डिलिव्हरी’ची सेवा दिली जात आहे. ग्राहकांच्या शरीराचे तापमान घेऊन त्यांच्या हातावर सॅनिटायझर दिले जाते. सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी बिलिंग काऊंटरची जागा बदलण्यात आली आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ट्रायल रूम बंद ठेवण्यात आल्या आहेत.