ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. पुण्यातील रत्ना हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भेंडे हे गेल्या सहा दशकाहून अधिक काळ रंगभूमीवर कार्यरत होते. महाराष्ट्र शासनातर्फे मराठी नाट्यक्षेत्रातील ज्येष्ठ व श्रेष्ठ कलाकारास देण्यात येणाऱ्या रंगभूमी जीवन गौरव पुरस्काराने भेंडे यांना गौरविण्यात आले होते. सहा दशकांहून अधिक काळ अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आत्माराम भेंडे यांनी इंडियन नॅशनल थिएटरमधून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशा तिन्ही भूमिका सांभाळताना त्यांनी हिंदी व इंग्रजी रंगभूमीवरही कामाचा ठसा उमटवला. झोपी गेलेला जागा झाला, तरूण तुर्क म्हातारे अर्क, पिलूचं लग्न, दिनूच्या सासूबाई राधाबाई, पळा पळा कोण पुढे पळे, तुज आहे तुजपाशी, मन पाखरू पाखरू, प्रीती परी तुजवरी अशी त्यांची अनेक नाटकं गाजली. दूरदर्शनवरील मालिकाही त्यांनी दिग्दर्शित केल्या होत्या.
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाच्याच दिवशी, माजी नाट्यसंमेलनाध्यक्ष भेंडेंचं निधन झाल्यानं मराठी कलाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.