ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा मुळशी तालुक्यातील डोंगरगाव होतले येथील जमिनींच्या प्रकरणी अटकपूर्व जामीन अर्ज येथील न्यायालयाने फेटाळला आहे.

गोखले यांच्यासह सुजाता फार्म लि या कंपनीचे संचालक जयंत म्हाळगी व सुजाता म्हाळगी या तिघांवर मुळशी तालुक्यातील डोंगरगाव व होतले येथील विविध जमीन गटांची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यांच्या विरोधात जयंत प्रभाकर बहिरट (रा. कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे. या गुन्ह्यात १४ गुंतवणूकदारांनी न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर न्यायालयाने फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपास करण्याचा आदेश पोलिसांना दिला होता.

न्यायालयाने यापूर्वी त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. मात्र अंतिम निकाल देताना गोखले यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एम. देशपांडे यांच्या न्यायालयात या जामिन अर्जाची सुनावणी झाली.

दरम्यान, सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने उच्च न्यायालयात अर्ज करण्यास मुदत मिळावी, अशी विनंती गोखले यांच्या वतीने न्यायालयात करण्यात आली. त्यानुसार न्यायालयाने या निकालास १७ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली आहे.