ज्येष्ठ कृषी अर्थतज्ज्ञ मिलिंद मुरुगकर यांचे मत

पुणे : रोजगारनिर्मिती हे भारतापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. त्यासाठी औद्योगिक क्षेत्राच्या उत्पादनांना मागणी वाढली पाहिजे आणि ती क्षमता केवळ शेतीमध्येच आहे. शेतीविकासामध्ये सर्वसमावेशक औद्योगिकीकरणाचा पाया सामावला आहे, असे मत ज्येष्ठ कृषी अर्थतज्ज्ञ मििलद मुरुगकर यांनी सोमवारी व्यक्त केले. एल्गार मोर्चाने खरा शेतकरी शहरी समाजासमोर आणला, असेही त्यांनी सांगितले.

टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड आणि केसरी सहप्रायोजक असलेल्या ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमात ‘शेतीवरील संकट.. तुमचं-आमचं जगणं’ या विषयावर मुरुगकर यांचे व्याख्यान झाले. ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम यांनी प्रास्ताविकामध्ये या कार्यक्रमामागची भूमिका स्पष्ट केली. केसरीच्या वंदना मुळे यांनी मुरुगकर यांचा सत्कार केला.

‘शेतीचा विकास झाला, तर  बहुसंख्य जनतेची क्रयशक्ती वाढेल आणि सर्वसमावेशक औद्योगिकीकरणाचा पाया घातला जाईल. बहुतांश सर्व प्रगत देशांच्या विकासात शेतीच्या विकासाचा टप्पा हा महत्त्वाचा होता आणि शेतीवर अवलंबून असलेली लोकसंख्या कमी होणे हे शेतीच्या विकासामुळेच जलद गतीने शक्य होईल,’ असे सांगत मुरुगकर यांनी चीन, अमेरिका आणि कॅनडा या देशांची उदाहरणे दिली. ‘शेतीमध्ये असलेले बहुसंख्य शेतकरी हा अल्पभूधारक आणि कोरडवाहू स्वरूपाचा आहे. त्याला डोळ्यासमोर ठेवूनच धोरणे आखली गेली पाहिजेत. मात्र, दुर्दैवाने प्रस्थापित शेतकरी नेतृत्व हे या शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करत नाही. या पाश्र्वभूमीवर नुकताच निघालेला एल्गार मोर्चा हा क्रांतिकारी होता. या मोर्चाने खरा शेतकरी शहरी समाजासमोर आणला.’

‘मेक इन इंडिया’ योजनेच्या साडेतीन वर्षांनंतर रघुराम राजन यांनी या योजनेला ‘मेक फॉर इंडिया’ची जोड दिली पाहिजे, असे विधान केले होते. चीनला अनुकूल होती तशी जागतिकीकरणाची परिस्थिती भारताला अनुकूल नाही. त्यामुळे झपाटय़ाने आर्थिक संपत्ती वाढण्यासाठी देशांतर्गत मागणीमध्ये वाढ झाली पाहिजे हा त्यामागचा अर्थ होता, असे सांगून मुरुगकर म्हणाले,‘ तंत्रज्ञानाची साथ, किमान हमी भावाची शाश्वती आणि किंमत विमा याच्या बळावरच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतील. सिंचनाचा प्रश्न सोडविण्याचे आव्हान पेलले पाहिजे. शेतीचा विकास हाच सर्वात महत्त्वाचा मुद्दा असला पाहिजे. नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांनी शेततळी करण्याचे काम पुढे ढकलले. असंघटितांच्या वेदना आणि त्यांचे हुंदके जाणवत नाहीत. त्यातूनच कर्जमाफीची मागणी पुढे येत असते.’

या वेळी श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मुरुगकर यांनी मोकळेपणाने उत्तरे दिली. भक्ती बिसुरे यांनी सूत्रसंचालन केले.