पिंपरी- चिंचवडमध्ये भरधाव रिक्षेचा अपघात झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या अपघातात २ विद्यार्थी जखमी झाले असून रिक्षेने महामेट्रोने उभारलेल्या बॅरिगेट्सला धडक दिल्याने हा अपघात झाला. सतर्क नागरिकांनी रिक्षेतून वेळीच विद्यार्थ्यांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.
कासारवाडी परिसरात मेट्रोचे काम सुरु असल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. मेट्रोच्या कामासाठी ठिकठिकाणी बॅरिगेट्स लावले आहेत. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षेचा अपघात झाला. अरुंद रस्त्यावर चालक रिक्षा वेगाने चालवत होता. यादरम्यान चालकाचे रिक्षेवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी पाच विद्यार्थी रिक्षेत होते. यातील दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. सर्व विद्यार्थी हे खडकीतील सेंट जोसेफ शाळेतील विद्यार्थी असल्याची माहिती समोर येत आहे. सतर्क नागरिकांनी तातडीने रिक्षा खाली असलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 28, 2018 6:28 pm