पुणे आणि शहर परिसरातील अनेक भागात कालपासून तापमानात घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. पहाटेच्या वेळी धुक्यात वाट दिसेनासी होतं आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गही आज सकाळपासून धुक्यात हरवल्याचे दिसत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला आहे.

द्रुतगती महामार्गावरील लोणावळा-खंडाळा हा घाट परिसर थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमानात घट झाल्याने पहाटेच्यावेळी दाट धुकं पहायला मिळत आहे. आज (शनिवारी) सकाळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या धुक्याचा अडथळा सहन करावा लागत आहे. धुक्यात वाट हरवल्याने वाहन चालक आपली वाहने सावकाश चालवत आहेत. त्यामुळे नेहमी सुसाट वेगाने धावणाऱ्या या महामार्गावरील वाहतुक आज मंदावली होती. महामार्गावरून वाहने चालवताना चालकांना वॉर्निंग इंडिकेटर्स आणि फॉग लाईट लाऊन वाहने चालवावी लागत आहेत.

गेल्या आठवड्यात भारताच्या दक्षिण किनारपट्टीवरून अरबी समुद्रापर्यंत पोहोचलेल्या ओखी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागात पाऊस झाला होता. या काळात तापमानातही वाढ झाली होती. मात्र, या पावसानंतर आता थंडीचा जोर वाढू लागला आहे. लोकांनी आपले स्वेटर्स आणि मफलर कपाटातून बाहेर काढले आहेत. तर अनेक ठिकाणी पहाटे आणि रात्रीच्यावेळी शेकोट्या पेटताना दिसत आहेत.